लग्नघरी तृतीयपंथींचा धिंगाणा; २१ हजार मागितले; गोराईतील धक्कादायक प्रकार
By गौरी टेंबकर | Published: December 17, 2022 05:52 AM2022-12-17T05:52:58+5:302022-12-17T05:54:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोराई परिसरात शुक्रवारी दुपारी एका लग्नघरात घुसून बळजबरी २१ हजार रुपये तीन तृतीयपंथीयांनी मागितले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोराई परिसरात शुक्रवारी दुपारी एका लग्नघरात घुसून बळजबरी २१ हजार रुपये तीन तृतीयपंथीयांनी मागितले. मात्र, इतकी मोठी रक्कम देण्यास नकार देत पोलिसांना कळविल्याने त्यांनी त्याठिकाणी बराच तमाशा केला आणि तिथून पळ काढला. मात्र, जाताना पुन्हा हत्यार घेऊन परत येण्याची धमकी कुटुंबीयांना दिली.
नवरदेव शिरीष (नावात बदल) यांचे लग्न आहे. ते बोरिवलीच्या गोराई २ परिसरात राहत असून शुक्रवारी त्यांची हळद होती. शुक्रवारी दुपारी तीन किन्नर त्यांच्या घरी आले. सुरुवातीला त्यांनी नाच गाणे करत नवरदेव व कुटुंबीयांना आशीर्वाद दिले. तेव्हा साडी चोळी आणि एक हजार एक रुपयांचे पाकीट भरून घरच्यांनी त्यांना दिले.
मात्र, त्यांनी २१ हजारांच्या खाली एक रुपयाही घेणार नाही, असे नवरदेवाला सांगितले. त्यास नकार मिळताच किन्नर गोंधळ घालू लागले. अखेर पोलिसांना कळवताच किन्नरांनी पळ काढला.
किन्नर झाला विवस्त्र
लग्नघरात किन्नराने विवस्त्र होत शाप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लग्नसमारंभात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
आम्ही यावर लक्ष ठेवू
लग्नघर असल्याने तक्रार करण्यासाठी नवरदेवाला पोलिस ठाण्यात येणे शक्य नव्हते. दरम्यान याबाबत बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना माहिती दिल्यावर आम्ही यावर लक्ष ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले.