कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:42 PM2020-08-11T21:42:03+5:302020-08-11T21:43:44+5:30
कंटेनर जप्त, लकडगंज पोलिसांची कारवाई
नागपूर : कुणी सायकल, कुणी दुचाक्या चोरतो, तर कुणी अन्य वाहने चोरतात. नागपुरात मात्र एक असा चोर आहे, जो चक्क ट्रक आणि कंटेनर चोरतो. या चोरट्याच्या लकडगंज पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर ही अफलातून माहिती उजेडात आली. संजय गोविंदराव ढोणे (वय ५२) असे या चोरट्याचे नाव असून, तो मानकापूरच्या जय हिंद नगरात राहतो.
रहिश जीवना खान (वय ४७) हे हरियाणातील नुह जिल्ह्यातील पू सिंगार पुहना गावचे रहिवासी आहेत. ते कंटेनर चालवितात. दिल्लीतून कंटेनरमध्ये ब्लँकेट घेऊन खान सोमवारी दुपारी नागपुरात आले. त्यांनी आपला कंटेनर वर्धमान नगरातील एचपी पेट्रोल पंपासमोर लावला आणि चहा नाश्ता करण्यासाठी क्लीनर सोबत हॉटेलमध्ये गेले. चावी कंटेनरलाच लागून होती. ही संधी साधून आरोपी संजय ढोणेने हा कंटेनर पळवून नेला. चहा नाश्ता करून परतल्यानंतर कंटेनर दिसत नसल्यामुळे खान यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कंटेनरचा माग काढत घटनास्थळापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या धापेवाडा जवळच्या घोटी सिल्लोरी जवळ कंटेनर सापडला. आरोपी संजय ढोणे याला पोलिसांनी अटक केली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक सानप, उपनिरीक्षक सुनील राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक रवि राठोड, हवालदार प्रकाश श्रीराम, नायक वासुदेव जयपुरकर, राम यादव यादव, फिरोज खान, जगदीश परतेकी आणि सचिन बारसागडे यांनी ही कामगिरी बजावली.
आतापर्यंत ३४ वाहने चोरली
ढोणेची चौकशी केली असता पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती मिळाली. त्याच्याविरुद्धचा हा ३४ वा चोरीचा गुन्हा असून त्यातील २५ गुन्हे ट्रक, कंटेनर चोरीचे आहेत, असे उघड झाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही
सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद