हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई, नक्की प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:09 AM2024-04-11T11:09:00+5:302024-04-11T11:16:43+5:30
वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांच्या 'इकोनॉमिक ऑफेन्सेस विंग'ने ठोकल्या बेड्या
Hardik Pandya stepbrother arrested: भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वैभववर हार्दिक-कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे ४.३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय वैभव पांड्यावर भागीदारी फर्मकडून सुमारे ४.३० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हार्दिक-कृणालचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कथित गैरव्यवहारात निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
अहवालानुसार, तीन वर्षांपूर्वी तीन व्यक्तींनी संयुक्तपणे विशिष्ट अटींसह पॉलिमर व्यवसाय स्थापन केला. पांड्या बंधूंनी ४० टक्के भांडवलाची गुंतवणूक करायची होती तर वैभवने २० टक्के गुंतवणूक करून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करायचे होते. या शेअर्सनुसार व्यवसायातील नफा वाटला जाणार होता. मात्र, वैभवने आपल्या सावत्र भावांना न सांगता या व्यवसायात दुसरी फर्म स्थापन करून भागीदारी कराराचा भंग केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे.
वैभवच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की भागीदारीचा प्रत्यक्ष नफा कमी झाला. सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. वैभवने नफ्याचा हिस्सा २० टक्क्यांवरून ३३.३ टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यामुळे हार्दिक आणि कृणाल पंड्याला मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कारवाईमध्ये वैभव पांड्यावर फसवणुकीचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणी पांड्या बंधूंनी कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही. कारण पांड्या बंधू आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे तर कृणाल पांड्या लखनौ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व करत आहे.