दारूच्या नशेत 'तो' घरी आला, वैतागलेल्या पत्नीने 30 सेकंदात 15 वेळा मारलं, आई-बहिणीनेही बदडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 07:30 PM2023-01-14T19:30:00+5:302023-01-14T19:30:02+5:30
दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून पती रोज दारू पिऊन गोंधळ घालतो.
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये दारूच्या नशेत असलेल्या पतीला घरातील सदस्यांना त्रास देणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याची पत्नी, आई आणि बहिणीने मिळून त्याची यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली आहे. तिघींनी मिळून दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात 15 वेळा मारलं. मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आला असून तो आता जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
भानपूर येथील रहिवासी असलेला अमित अवस्थी हा बालामऊ येथील रेल्वे गंज येथे एका खासगी दुकानात काम करतो. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून तो रोज दारू पिऊन गोंधळ घालतो. शुक्रवारीही अमित दारू पिऊन घरी पोहोचला आणि गोंधळ घालू लागला.
पतीच्या या त्रासाला वैतागलेल्या पत्नी शिखाने सासू व नणंदेसह अमितला काठ्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान रस्त्यावरून जाणारे व दुकानदार हे दृश्य पाहत राहिले. दररोज पत्नीकडून मारहाण होत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. अनेकवेळा घरच्यांनी त्याला पोलीस ठाण्यात पाठवलं पण त्यात काहीच सुधारणा झाली नाही.
न्यायाधिकारी बघौली विकास कुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तीन महिला त्या तरुणाला काठ्यांनी मारहाण करत आहेत. मारहाण करणाऱ्या महिला त्याची पत्नी, आई आणि बहीण असल्याचे सांगण्यात येत आहे. दारूच्या नशेत गोंधळ घातल्याने नातेवाईकांनी मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"