संतापजनक! नववधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही; कारसाठी लग्न केलं रद्द, हुंड्यामुळे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 02:33 PM2023-01-26T14:33:59+5:302023-01-26T14:38:47+5:30
वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की आलिशान गाडी न मिळाल्याने वराकडची मंडळी वरात घेऊन येत नव्हती. हे समजताच वधूपक्षात एकच खळबळ उडाली.
नवरीकडच्या मंडळींनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ज्वालापूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुफरान अहमद उर्फ पप्पू यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी दानिश अब्बासीसोबत निश्चित झाले आहे.
लग्नाच्या वेळी वराला, त्याचे वडील आणि कुटुंबीयांना सोन्याचे दागिने आणि रोख 1.21 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सात लाख रुपये रोख व इतर भेटवस्तूही दिल्या. यावर्षी 22 जानेवारीला वरातीपूर्वी मुलाच्या वडिलांनी स्कूटीची मागणी केल्याने त्यांनी मध्यस्थांच्या खात्यात 1.10 लाख रुपये टाकले. त्याचवेळी 15 लाख रुपये रोखही देण्यात आले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वरात पोहोचली नव्हती
काही वेळाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हुंड्यात हुंडई व्हर्ना कार नको, तर इनोव्हा क्रिस्टा कार हवी असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला खूप समजावले पण तो तयाप झाला नाही. त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सांगितले की अनेक लोकांविरुद्ध फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"