३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपीआय ॲपद्वारे उकळलेल्या खंडणीची डायरी सीबीआयच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:46 AM2023-03-03T09:46:16+5:302023-03-03T09:46:27+5:30
सीबीआयची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विमानतळावरील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
- आशिष सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीपे तसेच अन्य युपीआय ॲपच्या माध्यमातून मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांची चालविलेल्या खंडणी रॅकेटप्रकरणी मुंबई सीबीआयच्या पथकाने जेएनपीटी येथे दोन कस्टम हाऊस एजंटांच्या घरांची आणि कार्यालयांची आज झडती घेतली. या कारवाईत सीबीआयच्या हाती एक डायरी लागली असून, त्यातून मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन खंडणीचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावरील ३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
युपीआय ॲप खंडणी प्रकरणात अटक करून आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आलेला कस्टम अधीक्षक आलोक कुमार प्रवाशांना कस्टम ड्युटी न आकारण्याच्या बदल्यात उकळलेली रक्कम कुठल्या तरी लोडर अथवा एजंट अशा व्यक्तींच्या खात्यात जमा करत होता. ते लोडर नंतर आपले कमिशन कापून उर्वरित रक्कम आलोक कुमारला देत असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांना आढळले होते. त्याच प्रकरणात न्हावा शेवा कस्टम हाऊसमधील या दोन एजंटांची नावे सीबीआय अधिकाऱ्यांना समजली होती. हे दोघे एजंट हे आलोक कुमारप्रमाणेच मुंबई विमानतळावरील इतर कस्टम अधिकाऱ्यांनाही त्यांनी उकळलेल्या ऑनलाइन खंडणीची रक्कम आपले कमिशन कापून रोख रकमेच्या स्वरूपात देत असत.
सीबीआयची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विमानतळावरील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात २७ कस्टम अधीक्षक, सात कस्टम अधिकारी तसेच चार हेड हवालदारांचा समावेश आहे. मात्र, या बदल्या नियमित असून, त्यामागे अन्य कोणतेही कारण नसल्याची सारवासारव अतिरिक्त कमिशनर अजित दान यांनी केली.
असे उघडकीस आले रॅकेट...
नोव्हेंबर महिन्यात कस्टम अधीक्षक आलोक कुमार याने दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून दोन युपीआय अकाऊंटच्या माध्यमातून १३ हजार आणि १७ हजार अशा रकमा उकळल्या होत्या. त्या प्रवाशाने या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली होती.
खोलात जाऊन तपास केला असता, कस्टम ड्युटी चुकविण्यासाठी युपीआय ॲपद्वारे चाललेल्या या खंडणी प्रकरणाची माहिती सीबीआयच्या हाती आली होती. आलोक कुमारसह अन्य दोन अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचेही सीबीआयला आढळले होते. ही रक्कम न्हावाशेवाचे लोडर प्रशांत अंबेडे आणि संजय जोशी यांच्या युपीआय अकाऊंटमध्ये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याचाच तपास करत सीबीआय एजंटांपऱ्यंत पोहोचली.