मुंब्रा पोलीस ठाण्यालगतच पकडली हातभट्टीची दारू; राज्य उत्पादन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 06:43 PM2022-06-09T18:43:12+5:302022-06-09T18:43:20+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एकजण वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खब-यामार्फत माहिती मिळाली.
डोंबिवली: डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्री कौसा मुंब्रा भागातील जामा मशिदच्या समोर सापळा लावून एका कारमधून ६४० लीटर सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रूपये किमतीची गावठी दारू जप्त केली. महत्वाचे म्हणजे ही कारवाई कौसा मुंब्रा पोलिस ठाण्याच्या बाजुलाच करण्यात आली आहे. ही दारू फुग्यांमधून भरून विक्रीसाठी नेण्यात येत होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एकजण वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खब-यामार्फत माहिती मिळाली. पाटील यांनी त्यांच्यासह पथकातील दुय्यम निरीक्षक मल्हारी एस. होळ, सागर धिंदसे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक पी. ए. महाजन, अमृता नगरकर, प्रीती पाटील, हनुमंत देवकते, शिवराम जाखीरे आदिंनी संबंधित ठिकाणी सापळा लावला. एक कार जामा मशिदीसमोर येऊन थांबली. पथकाने संशयावरून वाहनचालकाला विचारणा केली असता तो घाबरला. त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याच्या वाहनाला घेरले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता ६४० लीटर गावठी दारूचे फुगे आतमध्ये आढळुन आले.
विवेक पाटील (वय २८ ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. तो कल्याण-शीळ मार्गावरील पडले गावचा राहणारा आहे. त्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्याने दारू कुठून आणली ? ती कुठे विक्रीला नेण्यात येणार होती ? याची चौकशी सुरू असल्याची माहीती निरीक्षक किरणसिंग पाटील यांनी दिली. गेल्या वर्षभरात डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाने उंबार्ली टेकडी, मलंगगड डोंगर, हेदुटणे आदी भागात छापे मारून लाखो रूपयांची गावठी दारू जप्त केली आहे.