Hathras Gangrape : पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला अन् धक्कादायक माहिती झाली उघड
By पूनम अपराज | Published: October 1, 2020 04:32 PM2020-10-01T16:32:29+5:302020-10-01T16:33:13+5:30
Hathras Gangrape : वारंवार गळा दाबल्याने पीडितेच्या गळ्याचे हाड तुटले आहे. तसेच गळ्यावर त्यासंबंधी खुणाही मिळाल्याचे रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टमध्ये बलात्काराचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा पोस्टमार्टम केला होता. त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पीडितेचा मृत्यू गळ्याचे हाड तुटल्याने झाला आहे. वारंवार गळा दाबल्याने पीडितेच्या गळ्याचे हाड तुटले आहे. तसेच गळ्यावर त्यासंबंधी खुणाही मिळाल्याचे रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टमध्ये बलात्काराचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
गळा दाबल्याने सर्वायकल स्पाईन तुटले त्यामुळे तरूणीचा मृत्यू झाला, हेच तिच्या मृत्यूचं मूळ कारण आहे. असे सफदरजंग रुग्णालयाने दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान याआधी अलीगढच्या जेएन मेडिकल कॉलेजने सुद्धा गळ्याचे हाड तुटल्याने पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, या रिपोर्टमध्ये सुद्धा बलात्काराचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, मृत्यूपुर्वी पीडितेने दिलेल्या जबाबात तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे याबाबत म्हटले आहे. त्यांतर ओढणीने बांधून तिचा गळा दाबण्यात आला आहे. असे पीडितेने मृत्यूपुर्वी जबाबात म्हटले होते.
Hathras Gangrape : महिला वकिलांनी लिहिले CJI यांना लिहिले पत्र, HC च्या देखरेखीखाली व्हावा तपास https://t.co/7ZYclNTejb
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2020
दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापन केली असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना करण्यात आली आहे. डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन SIT ला दिलेल्या वेळेत रिपोर्ट सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की, रस्त्यावर पडले; आंदोलनाला बसलेhttps://t.co/A07HfSw26r#Congress#RahulGandhi#PriyankaGandhi#HathrasHorror#YogiGovernment#HathrasCase@INCIndia
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2020
एकीकडे विरोधीपक्ष योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सरकार दबावाखाली आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली असून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींनापोलिसांनी अडवलं. यामुळे पायी प्रवास करत ते हाथरसकडे रवाना झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापणार असल्याची शक्यता आहे.