गुंगारा देण्यासाठी वापरला केसांचा टोप; मुलुंड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला उलगडा, गँगस्टरसह ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:57 PM2022-02-08T12:57:05+5:302022-02-08T12:58:08+5:30
दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले.
मुंबई: मुलुंडमध्ये सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींपैकी एकाने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बनावट केसांचा टोप घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मुलुंड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करत उत्तरप्रदेशातील गँगस्टरसह ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मुलुंडच्या पाच रस्ता परिसरातील एडनवाला इमारतीत तक्रारदार विक्रम पारेख यांच्या ‘व्ही. पी. पटेल एंटरप्रायझेस’ यांच्या कार्यालयात २ फेब्रुवारी बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची रोकड चोरून आरोपींनी पळ काढला होता. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतिलाल कोथम्बिरे, तपासाधिकारी दिलीप धामुनसे, संतोष कांबळे, शरद बागल, प्रकाश काळे, मुलानी, पंडित सोनवणे यांच्यासह १२ पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. या गुन्ह्यात वापरलेल्या इको कारचा क्रमांकावरून पथकाने शोध सुरू केला. सीसीटीव्हीनुसार, आरोपी सोनापूरमार्गे गांधीनगरवरून नवी मुंबईच्या दिशेने गेले. पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचू नये म्हणून ते गाडीचा वाहन क्रमांक सतत बदलत होते.
दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले.
मनोज काळे, नीलेश चव्हाण, नीलेश सुर्वे, बिपीन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू रत्नेश उर्फ अनिल कुमार सिंग, दिलीप शंकर सिंह, वशीउल्ला चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोनू आणि चौधरी मास्टरमाईंड आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहेत.
...अशी केली आरोपींना अटक
पथकाने गाडीचा क्रमांक शोधून बदलापूरमधून नीलेश मंगेश चव्हाण (३४) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळाले. त्याच्या लोकेशनवरून पथकाने नवी मुंबई, उज्जैन, मध्य प्रदेश, सुरत, गुजरात, वाराणसी, सुरत, उत्तरप्रदेश येथून आरोपीना अटक केली.