घराकडे का बघतो विचारले अन् भावांना झाली पाईपाने मारहाण, जळगावातील प्रकार
By सागर दुबे | Published: April 10, 2023 02:19 PM2023-04-10T14:19:48+5:302023-04-10T14:20:27+5:30
रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली घटना
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: आमच्या घरासमोरून वारंवार ये-जा करून घराकडे का बघता, त्यामुळे आमची बहिण घाबरते असे सांगितल्याचा राग येऊन दोघांकडून भावांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शाहुनगरातील मिश्राजी सायकल मार्टजवळ घडली. या प्रकरणी रविवारी तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
शाहुनगर येथे मयुर शशिकांत रानवडे हा तरूण आई-वडील, मोठा भाऊ कल्पेश व लहान बहिणीसह वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहूनगरातील दोन तरूण रानवडे यांच्याकडून वारंवार ये-जा करून घराकडे बघायचे. अखेर शनिवारी रात्री ११ वाजता कल्पेश हा मिश्राजी सायकल मार्टजवळ उभा असताना त्याला ते दोन तरूण पुन्हा घराकडून जाताना दिसले. त्याने त्यांना थांबवून तुम्ही आमच्या घराकडे का बघता, तुमच्यामुळे आमची बहिण घाबरतले, असा तो म्हणाला. याचा राग येवून दोघांना कल्पेश याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेला भाऊ मयूर याला सुध्दा दोघांनी प्लॉस्टिकच्या पाईपने डोक्यात मारहाण केली. यात डोक्यात गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली. अखेर मयूर याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी त्याने तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.