जळगावात बंद घर फोडून ३५ हजाराचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:34 PM2021-01-12T12:34:28+5:302021-01-12T12:36:06+5:30
House Breaking : पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
जळगाव : बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी विशाल रणजितसिंग पाटील यांच्या कपाटातील दहा हजाराची रोकड व दागिने असा ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी मंगळवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील (३२) हे खासगी कंपनीत नोकरीला असून कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात पत्नी सोनाली व मुलगी युक्ता यांच्यासह वास्तव्याला आहेत. ७ जानेवारी ते घराला कुलुप लावून पत्नी व मुलीसह दोंडाईचा येथे गेले होते. सोमवारी रात्री घरी परतले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता तर घरातील कपाटही उघडे होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर रोख रक्कम व दागिने तपासले असता गायब झालेले होते. चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची मुलीची सोन्याची अंगठी, १० हजार रुपये रोख व ५ हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या सोन्याच्या कड्या असा ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघड झाले. पाटील यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांनी ठशांचे नमुने घेतले. तपास सतीश हळणोर करीत आहेत.