मैत्रिणीला भेटायला आला अन् सापडला पोलिसांच्या जाळ्यात; गँगस्टर शार्पशूटर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:54 PM2020-10-10T23:54:22+5:302020-10-11T06:58:13+5:30
कुख्यात गुंड सुनील गायकवाड। कोरोना बरा होताच गाठले कळव्यातील मैत्रिणीचे घर
जितेंद्र कालेकर
ठाणे: अभिनेता राकेश रोशन यांच्यावरील गोळीबारासह तब्बल ११ खून आणि सात खुनांच्या प्रयत्नातील गँगस्टर शार्पशूटर सुनील विश्वनाथ गायकवाड (५२) हा कळव्यातील एका जिवलग मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. मात्र, याची खबर पोलिसांना मिळाल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. शनिवारी पहाटे त्याला मुंबईतील पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नाशिक कारागृहातून २८ दिवसांच्या पॅरोलवर सुटलेला गायकवाड पसार झाला. त्याकरिता त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कळव्यातील मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रोहन म्हात्रे आणि दत्तात्रेय घोडके यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने त्याला कळव्यातून ताब्यात घेतले.
कळव्यातील पारसिक सर्कल परिसरात राहणाºया मैत्रिणीला भेटण्यासाठी आलो होतो, असे चौकशीमध्ये विवाहित सुनीलने पोलिसांना सांगितले. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. गायकवाड त्याच्यावरील अनेक गुन्ह्यांतून निर्दाेष सुटला आहे.
रोशन हल्ल्यातूनही सुटका
सिनेअभिनेते राकेश रोशन यांच्यावर २००० साली केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यातही राकेश रोशन यांनी कोर्टात ‘नॉट रिमेंबर’ असे न्यायालयात सांगितल्यामुळे त्याची सुटका झाल्याचे समजते.
मोक्काखाली अटक
विक्रोळी पार्कसाइट येथील जिमाउद्दीन शेख या हॉटेलमालकाच्या खून प्रकरणात त्याला १९९९ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खून तसेच मोक्कांतर्गतही गुन्हा दाखल झाला होता. मोक्कावगळता खुनाच्या गुन्ह्यात त्याला मुंबई न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मूळचा घाटकोपर रमाबाईनगरातील
मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाईनगर येथे त्याचे घर असले तरी मुंबईतच वेगवेगळ्या नातेवाइकांकडे किंवा मित्रांकडे त्याचे वास्तव्य होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला वारंवार राहण्याचे ठिकाणही बदलावे लागत होते.