झोपलेल्या पती-पत्नीवर घरात घुसून धारदार चाकूने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:38 PM2021-12-19T21:38:53+5:302021-12-19T21:40:13+5:30
Crime News : पूर्वेकडील बावशेतपाडा येथील चौबे चाळीत अमित मिश्रा (24) आणि त्याची पत्नी ज्योती मिश्रा हे दोघे राहतात. शुक्रवारी रात्री दोघेही घरी झोपलेले असताना माथेफिरू आरोपीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश केला.
नालासोपारा - संतोष भवनच्या बावशेत पाडामधील एका चाळीतील घरात शुक्रवारी रात्रीच्या वेळी झोपलेल्या पती व पत्नीवर माथेफिरू हल्लेखोराने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात व घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना उपचारासाठी स्थानिक लोकांनी विजय नगरच्या मनपाच्या रुग्णालयात नेले. पण दोघांची नाजूक स्थिती पाहता डॉक्टरांनी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात नेण्यास सांगितले. दोघेही जखमींना अतिदक्षता विभागात भर्ती करून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आरोपी माथेफिरूवर दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत तपास करत आहे.
पूर्वेकडील बावशेतपाडा येथील चौबे चाळीत अमित मिश्रा (24) आणि त्याची पत्नी ज्योती मिश्रा हे दोघे राहतात. शुक्रवारी रात्री दोघेही घरी झोपलेले असताना माथेफिरू आरोपीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्याच्याकडील धारदार चाकूने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर, मानेवर आणि दंडावर तसेच अमितच्याही दंडावर सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. जखमी अमितने आरोपीला विरोध केला त्यामुळे आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे नागरिक उठले. आरोपी एक चाकू घरातच टाकून तेथून पळून गेला आहे. घरात व घराच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यातील अमित व पत्नी ज्योतीला स्थानिकांनी उपचारासाठी मनपाच्या हॉस्पिटलमध्ये नेले. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. सदर आरोपी हा शुक्रवारी सकाळी त्या परिसरात दिसल्याचे व अमितच्या मोबाईलवर आरोपीने जीवे ठार मारण्याचा संदेश पाठवला असल्याचे स्थानिकांनी लोकमतला सांगितले. नेमका हा आरोपी कोण आहे ? त्याने हा हल्ला का केला याचा पोलीस तपास करत आरोपीचा शोध घेत आहे.
शुक्रवारी रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या पतिपत्नीवर एका आरोपीने चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दोघेही जखमी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेत आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)