'तो' खून लुटमारीसाठी, मृतदेह फेकलेला नदीत; दोघांना अटक, एकजण पसार
By संजय पाटील | Published: March 1, 2024 10:11 PM2024-03-01T22:11:34+5:302024-03-01T22:12:00+5:30
कऱ्हाडातील जुन्या कोयना पुलानजीक आठ दिवसांपुर्वीचे खून प्रकरण
संजय पाटील, कऱ्हाड: येथील जुन्या कोयना पुलानजीक आठ दिवसांपुर्वी झालेल्या खुनप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून तो आरोपी पसार झाला आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही. लुटमारीच्या उद्देशाने हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सांगीतले.
शकील अन्वर शेख (वय २०, रा. दैत्यनिवारणी मंदीरानजीक, कऱ्हाड) व कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय २४, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कऱ्हाडनजीक जुन्या ब्रिटीशकालीन पुलाजवळ २३ फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील, गुन्हे शाखेचे पतंग पाटील, हवालदार शशी काळे, अमित पवार, कुलदीप कोळी यांच्यासह पथकाने तातडीने त्याठिकाणी भेट दिली. मृतदेह दोरीच्या सहाय्याने सिमेंट पाईपला बांधून पाईपसह तो नदीपात्रात टाकल्याचे पोलिसांना दिसून आले. संबंधिताचा खून झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती दिली. चार दिवस मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे तो सडलेला होता. परिणामी, मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी आल्या. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासाची दिशा निश्चित करुन पोलिसांनी मुंबई, पुणे, चिपळूनसह कर्नाटक राज्यातही तपास यंत्रणा राबवली. मात्र, तरीही मृताची ओळख पटली नाही.
दरम्यान, एका बाजुला मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, हवालदार शशिकांत काळे. अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी या गुन्ह्यात दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तातडीने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली देत मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.