ट्रांसपोर्टर स्टेटससाठी ठेवायचा तो देशी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:23 PM2020-07-08T22:23:50+5:302020-07-08T22:24:55+5:30
वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या चेन स्नॅचिंग पथकास अतुल कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अतुलला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा व पाच काडतुस सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अतुलने सात महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातून कट्टा आणल्याचे सांगितले. सूत्रानुसार अतुलचे म्हणणे आहे की, वाळू वाहतुकीचे काम अतिशय जोखमीचे आहे. अनेक ट्रान्सपोर्टर कट्टा ठेवतात. हे त्यांच्यासाठी स्टेटसचे काम करते. यामुळे त्यानेही स्टेटस म्हणून कट्टा आपल्याकडे ठेवला. गुन्हा करण्याचा कुठलाही उद्देश नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
सूत्रानुसार वाळू वाहतुकीशी संबंधित लोकांकडे कट्टा ठेवणे ही सामान्य बाब आहे. या व्यवसायात अनेक गुन्हेगार आहेत. त्यांचा एकमेकांशी व्यावसायिक वाद सुरु असतो. शस्त्र जवळ असल्यास प्रतिस्पर्धी घाबरून असतात. असे सांगितले जाते की, खापरखेडा किंवा मध्य प्रदेशातून कट्टे आणले जातात. त्यांना रेतीच्या टिप्परमध्ये लपवून आणले जाते. काही ट्रान्सपोर्टर तर कट्ट्याची तस्करीही करतात. हे एक मोठे रॅकेट असू शकते. याची सखोल चौकशी झाल्यास खरा प्रकार उघडकीस येऊ शकतो. पोलिसांनी अतुलला न्यायालयात सादर करून कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून त्याला जामीन दिला.