काम बघा, नंतर पगार ठरवा म्हणाला अन् दागिने घेऊन पळाला
By दत्ता यादव | Published: February 1, 2023 10:12 PM2023-02-01T22:12:24+5:302023-02-01T22:12:46+5:30
पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही.
सातारा : मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱ्या कारागिराने आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा, असे म्हणत सराफाचा विश्वास संपादन केला. यानंतर, पाचव्याच दिवशी त्याने दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना सातारा शहरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हसन तूरमहंमद शेख (वय ४३, रा. बुधवार पेठ, सातारा) यांचे बुधवार पेठेमध्ये 'एचएस गोल्ड स्मिथ' या नावाचे सोन्याचे दुकान आहे. मुंबईतील एका ओळखीच्या व्यक्तीने पाच दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिक हसन शेख यांना एक व्यक्ती तुमच्याकडे कामाला पाठवत असून त्याला कामाची गरज आहे, असे सांगितले. त्यानंतर सोफीकूल शेख (वय ३२, पश्चिम बंगाल) हा साताऱ्यात आला. हसन शेख यांच्या दुकानात तो गेला. ओळख झाल्यानंतर त्याने माझं आधी काम बघा. नंतर पगार ठरवा, असं सांगितलं. त्यामुळे हसन यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.
पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. सराफ व्यावसायिक हसन शेख यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानात दागिने पाहिले असता विविध प्रकारचे तब्बल दोन लाखांचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोफीकूल शेख याच्यावर गुन्हा दाखल केला. सहायक फाैजदार साबळे हे अधिक तपास करीत आहेत.