विवाह सोहळ्याला जाणाऱ्या महिलेची सात तोळ्याची सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 02:26 PM2021-01-11T14:26:54+5:302021-01-11T14:29:46+5:30
काळ्या रंगाच्या पल्सरवरुन महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणं पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्याने मागील अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकीनव आणले आहे.
पंचवटी : औरंगाबादरोडवरील एका लॉन्समध्ये विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे सात तोळे वजनाची अडीच लाख रुपये किंमतीची सोनसाखळी पल्सरदुचाकीने भरधाव आलेल्या चोरट्यांनी हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली. आठवडाभरापुर्वीही अशाच पध्दतीने या भागातील एका लॉन्सच्या परिसरात महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली होती. एकुणच सोनसाखळी चोरांच्या टोळीने विवाहसोहळ्यांसाठी येणाऱ्या महिलांवर वक्रदृष्टी केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये नातेवाईकाच्या लग्नसोहळ्याला आलेल्या वैभवी विश्वनाथ शेळके (३७ रा.गंगापुररोड) या त्यांचे पती व मुलांसमवेत लॉन्समध्ये जात असताना संध्याकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेत धूम ठोकली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात शेळके यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. शेळके पायी जात असताना संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावरुन त्याने भरधाव दुचाकी त्यांच्याजवळ आणली आणि पोत हिसकावुन सुसाट धूम ठोकली. पाच तोळ्याचे मंगळसुत्र त्यामध्ये एक तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे त्यामध्ये असलेले मणी असे सुमारे सात तोळ्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरुन त्वरित परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देत गस्तीवरील पोलिसांना सतर्क करण्यात आले; मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सोनसाखळी चोर हाती लागला नाही.