स्वत:वर ब्लेडनं वार करुन फौजदारास सत्तूरच्या मुठीनं मारुन केलं जखमी
By विलास जळकोटकर | Published: July 25, 2023 07:15 PM2023-07-25T19:15:07+5:302023-07-25T19:15:57+5:30
पोलिसांशी धक्काबुक्की : दोघा गुन्हेगारी भावांचा पोलिस ठाण्यात राडा
सोलापूर : स्थानबद्धतेची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगारानं त्याच्या भावाच्या मदतीनं पोलीस ठाण्यात येऊन स्वत:वर ब्लेडनं वार करीत फौजदारांना सत्तुरच्या मुठीनं मारुन जखमी केलं. पोलिसांशी झटापट करीत राडा केला. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा सिनेस्टाईल थरार घडला. या प्रकरणी फौजदार सचिन माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
मुकेश बोधीवाले व गंगाराम बोधीवाले (रा. नळ बझार, लष्कर सोलापूर) असे गुन्हे नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सदर बझार पोलिस ठाण्याच्या बाहेर आरडाओरडा सुरु असल्याने फिफर्यादी माळीसह सर्व सहकारी बाहेर आले. यावेळी मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले व त्याचा भाऊ गंगाराम उर्फ गंग्या बोधीवाले हे दोघे अमर माने याने आम्हाला मारहाण केली आहे त्याच्याविरुद्ध तक्रार घ्या म्हणून गोंधळ घालत होते. तक्रार घेण्याची तयारी करीत असताना आक्रमक होत त्यातील मुकेश याने खिशातून ब्लेड काढत स्वत:च्या हातावर वार करुन घेतला. त्याला पोलिस रोखण्यासाठी गेले असता पँटमध्ये खोचलेले कोयात काढून फिरवत पाठीमागच्या मुठीनं फौजदार माळी यांच्या हातावर मारले. त्याला ताब्यात घेताना पोलिसांनाही धक्काबुक्की केली. टेबलावरील कागदपत्रे फेकली. शेवटी दोघांनाही बळाचा वापर करुन ताब्यात घेण्यात आले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करीत आहेत.
शासकीय कामात अडथळा
स्थानबध्दतेची शिक्षा भोगून आलेला आरोपी गंगाराम याने पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सरतापे यांच्या छातीत जोराचा ठोसा मारला. यात सरतापे हे खाली पडल्याने त्यांच्या पाठीला मुक्का मार लागला. यानंतर या दोघांनी पोलीस ठाण्यातील टेबलावरील कागदत्रे अस्ताव्यस्त फेकून देऊन शासकीय कामात अडथळा केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.