खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:32 PM2023-05-18T12:32:01+5:302023-05-18T12:32:19+5:30

आराेपीवर ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, तब्बल ९ वर्षे दिला पाेलिसांना गुंगारा

'He' used to come to Vashi from Gujarat to threaten extortion; Jharkhand's most wanted gangster arrested by ATS | खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक

खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक

googlenewsNext

नवी मुंबई : झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे गुंगारा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुजरातमधून तो केवळ खंडणीसाठी फोन करण्यासाठी वाशीत येत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. खबऱ्याने टीप दिल्यानंतर झारखंड एटीएस व महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने आठवडाभर सापळा रचून सोमवारी रात्री त्याला अटक केली. टेलिग्राम ॲपद्वारे वाशी रेल्वेस्थानकाचे इंटरनेट वापरून तो फोन करायचा.

अमन सुशील श्रीवास्तव (३१) असे अटक केलेल्या झारखंडच्या गँगस्टरचे नाव आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, आर्म्स ॲक्ट असे ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, २०१५ पासून झारखंडचे दहशतवादविरोधी पथक त्याचा शोध घेत होते. मात्र, राहण्याचे ठिकाण सतत बदलून व फोनचा वापर टाळून तो गुंगारा देत होता. 

ठेकेदारांना टेलिग्रामवरून धमकवायचा अमन -
भूमिगत राहूनही अमन सुशील श्रीवास्तव झारखंडमधील खाणमालक व इतर मोठ्या ठेकेदारांना खंडणीसाठी टेलिग्रामवरून धमकवायचा. काही दिवसांपूर्वीच त्याच्या इशाऱ्यावरून टोळीच्या गुंडाने एका व्यावसायिकावर गोळीबारदेखील केला. त्यामुळे झारखंड एटीएसने अमनच्या हस्तकांना अटक केल्यानंतर ते त्याच्याही मागावर होते. महाराष्ट्र एटीएसच्या मार्गदर्शनाखाली रांची एटीएसचे प्रमुख आशुतोष सत्यम व नवी मुंबई एटीएसचे अधिकराव पोळ यांच्या पथकाने सोमवारी त्यास अटक केली.

रेल्वे स्थानकातील मोफत इंटरनेटचा वापर -
चौकशीत तो केवळ फोन करण्यासाठी वाशीत आल्याचे समोर आले. झारखंडच्या व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याकिरता तो टेलिग्राम ॲप वापरायचा. वाशी रेल्वेस्थानकाबाहेर येऊनच तिथले इंटरनेट वापरायचा. यादरम्यान स्वतःचा मोबाइल मात्र तो बंदच ठेवायचा. 

रिक्षाने मुंबईला, तिथून रेल्वेने गुजरातला -
व्यावसायिकाला धमकावून झाल्यानंतर तो रेल्वेने खारघरला जाऊन तिथून रिक्षाने मुंबईला व तिथून रेल्वेने गुजरातला जायचा. मागील अनेक वर्षांपासून तो रोहन विनोद कुमार या नावाने देशभरात वावरत हाेता. गुजरात व इतर ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी, प्रवासाकरिता तो याच नावाचा वापर करत होता. 

बनला वडिलांच्या गँगचा म्होरक्या -
२०१५ मध्ये वडील सुशील श्रीवास्तवच्या हत्येनंतर तो वडिलांच्या गँगचा म्होरक्या बनला होता. तेव्हापासून तो भूमिगत राहूनच गँग चालवायचा. गँगच्या सदस्यांनाही तो प्रत्यक्ष भेटत नव्हता. अधिक वेळ तो गुजरात व दिल्लीत राहत होता. व्यावसायिकाला धमकावण्यासाठी फोन करण्यासाठी तो वाशीत आल्यानंतर त्याला पकडले.

Web Title: 'He' used to come to Vashi from Gujarat to threaten extortion; Jharkhand's most wanted gangster arrested by ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.