रात्री करंट लावून 'तो' करायचा शिकार; वन विभागाने पहाटेच सापळ्यात अडकवले
By गेापाल लाजुरकर | Published: March 7, 2023 11:59 AM2023-03-07T11:59:48+5:302023-03-07T11:59:59+5:30
कुरखेडा तालुक्यातील घटना : आरोपीला तिसऱ्यांदा अटक
कुरखेडा (गडचिरोली) : जंगलात रात्री करंट (वीजप्रवाह) लावून वन्यप्राण्यांची तो शिकार करायचा. त्यानंतर पहाटे शिकार आणण्यासाठी जंगलात जायचा. असे एक नव्हे अनेक वन्यप्राण्यांचा बळी घेऊन मांसाहाराची चटक भागवणाऱ्या गेवर्धा येथील एका शिकाऱ्यास वन विभागाच्या चमूने मंगळवार ७ मार्च रोजी पहाटे ४ वाजता घटनास्थळीच जाळ्यात अडकवले. शिकार प्रकरणात अटक होण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे.
महादेव धोंडू तुलावी (६०) रा. गेवर्धा, ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे. कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा राखीव वन खंड क्रमांक १३३ मध्ये शिकारीचे प्रकार घडत असल्याच्या माहितीवरून वन विभागाचे पथक गस्तीवर होते. दरम्यान सोमवार ६ मार्चच्या रात्री ११:३० वाजताच्या सुमारास जंगलातून जाणारी ३३ केव्ही विद्युत वाहिनी ट्रिप झाली. विद्युतमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनी कार्यालय कुरखेडाचे पथक लाईन दुरुस्तीकरिता गेवर्धा वन परिक्षेत्रात दाखल झाले. महावितरणच्या पथकासोबत वन विभागाचे पथक सुद्धा जंगलातच होते. लाईनमधील बिघाड दुरुस्ती शोधताना रात्री २ वाजताच्या सुमारास विद्युत तारांवर आकडा टाकून वीजप्रवाह सोडून हरणाची शिकार झाल्याची बाब वनविभागाच्या पथकाच्या लक्षात आली. विद्युत कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह सुरळीत केला; पण घटनास्थळी कोणीच उपस्थित नव्हते. ज्याने शिकारीसाठी वीज प्रवाह सोडला तो तेथे परत येईल, अशी खात्री वन विभागाच्या पथकाला होती. या उद्देशाने वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाळत ठेवली. दरम्यान पहाटे ४ वाजता एक व्यक्ती टॉर्च घेऊन घटनास्थळाच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पथकाने मोठ्या शिताफीने सभोवताल घेरा टाकून त्या व्यक्तीला पकडले.
दरम्यान आरोपीची चौकशी केली असता महादेव धोंडू तुलावी (६०) रा. गेवर्धा, असे त्याने आपले नाव सांगितले. त्यानंतर पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला व शिकारीचे साहित्य जप्त केले. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आहे. ही कारवाई गेवर्धाचे क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे यांच्या नेतृत्वात वनरक्षक एस. डी. लेखामी, एस. व्ही. पिलारे, व्ही. बी. पावडे, व्ही. एल. हातमोडे यांनी केली. त्यांना वन मजूर अरुण डोंगरवार, प्रभू गायकवाड, हरी नैताम, मनोज वालदे तसेच महावितरणचे कर्मचारी अनिल बगमारे, संदीप क्षीरसागर, गोपाल बनकर, पवन बोरकुटे आदींनी सहकार्य केले.
दोन वेळा सुटला मोकाट; धुळवडीची हौस महागात
करंट लावून वन्य प्राण्यांची शिकार करणे व मांसाहार करण्याची चटक लागलेल्या आरोपी महादेव तुलावी याने यापूर्वीही अनेक शिकारी केल्या. यापूर्वी वनविभागाने त्याला दोन वेळा अटक केली होती; परंतु सबळ पुराव्यांअभावी तो मोकाट सुटला होता; परंतु आता तो रंगेहात अडकला. धुळवडीला मांस खाण्याची हौस त्याला चांगलीच महागात पडली.