‘तो’ रडतच झोपेतून उठतो, हात जोडतो आणि माफी मागतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:54 AM2022-08-04T07:54:49+5:302022-08-04T07:56:03+5:30
बेकायदा एफआयआरमुळे ९ वर्षांच्या मुलाची मन:स्थिती ढासळली, आईची व्यथा
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तो रात्री-बेरात्री झोपेतून उठतो आणि हात जोडून रडत माफी मागतो, त्याला सायकलची दहशत वाटते, मला त्याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागणार आहे’, अशी व्यथा वनराई पोलिसात बेकायदा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ९ वर्षीय मुलाच्या आईने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
हा गुन्हा दाखल करण्यासाठी दिंडोशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी वनराई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे खातेअंतर्गत चौकशीमध्ये उघड झाले. जो रद्द करण्यासाठी सिंगल मदर असलेल्या महिलेला हेलपाटे घालावे लागत आहेत.
प्रकरण नेमके काय?
अभिनेत्री सिमरन सचदेवा यांनी ही तक्रार दाखल केली होती. ज्यात गोरेगाव पूर्वच्या लोढा फिओरेन्झा येथे सायकल चालवत असताना ९ वर्षांच्या मुलाने तिच्या ६२ वर्षीय आईला धडक दिली. ज्यात त्या खाली पडून दुखापत झाल्याने हिपबोनची शस्त्रक्रिया करावी लागली.
मी गुन्हा दाखल करणार नाही
वनराई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील आणि स्टेशन प्रभारी निरीक्षक राणी पुरी यांनी सिमरनला परत पाठवले. त्यावेळी तिने कथितपणे दिंडोशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना याबाबत सांगितले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पाटील यांनी तानाजी याना फोन करत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला. तेव्हा त्यांनी ‘मी गुन्हा दाखल करणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितले.
तसेच बाल न्याय कायद्याबाबत संबंधित माहितीही त्यांना पाठवली. मात्र तरीही पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला.
त्यामुळे स्टेशन डायरीत संजय पाटील यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करत असल्याचे तानाजी यांनी नमूद केले.
एफआयआर का ‘बेकायदा’?
भारतीय दंडविधान संहितेचे कलम ८३ नुसार ७ ते १२ वयोगटातील व्यक्तीने केलेला गुन्हा हा गुन्हा मानण्यात येत नाही. कारण त्याच्या वागणुकीचे स्वरूप आणि परिणामांचा न्याय करण्यासाठी पुरेशी परिपक्वता त्याच्यात आलेली नसते.
- ॲड. विशाल सक्सेना,
सर्वोच्च न्यायालय
तो निव्वळ गैरसमज
गैरसमज झाल्याने गुन्हा दाखल झाल्याचे दिंडोशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे म्हणणे आहे. तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुलाचे रेकॉर्ड क्लीअर करा
माझ्या मुलाच्या मनात सायकलबाबत दहशत बसली आहे. तो खेळत नाही व झोपेत घाबरून उठतो. हात जोडत माफी मागतो. त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण रखडले. आमचे आंतरराष्ट्रीय व्हिसा रद्द होऊ शकतात. पोलिसांच्या गैरसमजाची शिक्षा माझ्या मुलाला भोगायला लावू नका. पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी माझ्या मुलाचे गुन्हेगारी रेकॉर्डमधून नाव वगळत ते क्लीअर करावे.
- पीडित मुलाची आई