मध्यस्थी करायला गेला अन् जीवच गेला; विटाने डोक्यावर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 09:35 PM2021-08-11T21:35:27+5:302021-08-11T21:35:47+5:30
Murder Case : मोलमजुरीच्या रकमेवरून उमरेड येथे खून
नागपूर (उमरेड): मोलमजुरीची रक्कम मिळाली नसल्याच्या कारणावरून दोघांचे भांडण झाले. तिसऱ्याने मध्यस्थी केली. आमच्या दोघांच्या मधात येणारा तू कोण, असा सवाल करीत आरोपीने मध्यस्थी करणाऱ्याच्या डोक्यावरच विटेने प्रहार केला. क्षुल्लक कारणावरून उमरेड येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडले. या घटनेमुळे पुन्हा एकदा उमरेड शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंट्या ऊर्फ प्रवीण विनायक कठाणे (३८) रा.मुळे ले-आऊट, उमरेड असे मृताचे तर आशिष सुरेश गजभिये (२१) रा. ओम पॉलटेक्निक, उमरेड असे आरोपीचे नाव आहे. उमरेड रेल्वे फाटक क्रमांक २ (ओम पॉलटेक्निक मार्ग) येथे ही घटना घडली.
आरोपी आशिष हा घर बांधकामाच्या मोलमजुरीची कामे करतो. एका ठिकाणच्या बांधकामाबाबतची रक्कम आरोपी आशिष गजभिये याने साहील दमके याला मागितली. यावरून दोघांचा वाद झाला. साहील हा बांधकाम साईटवर चौकादारीचे काम करतो. तिथे उपस्थित प्रवीण कठाने याने आशिषला हटकले. आमच्या वादात पडणारा तू कोण असा राग आरोपी आशिषने आळवला. यानंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशातच आशिष गजभिये याने रागाच्या भरात पिंट्या ऊर्फ प्रवीणच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत त्याला जागीच ठार केले. घटनेनंतर आरोपी आशिषने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. हत्याकांडाची माहिती पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंट्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. एका महिलेच्या चाकूहल्ला प्रकरणात तो जेलमध्ये होता. या प्रकरणात त्याला शिक्षा सुद्धा झाली होती.