दाढी करायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:07 PM2023-08-31T12:07:24+5:302023-08-31T12:07:32+5:30
पोलिस पथकाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारी व्हँनमध्ये बसून वस्तीत प्रवेश केला.
मुंबई / कल्याण : कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगरातील पोलिस आले असता, आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. पोलिस आणि आरोपीच्या नातेवाइकांमध्ये झटापट झाली. अखेरीस पोलिसांनी इराणी भामट्याच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या आरोपीचे नाव फिरोज खान असे आहे.
फिरोजला पकडण्यासाठी पोलिस पथकातील महिला पोलिसाने बुरखा परिधान करून वस्तीत प्रवेश केला. वस्तीतील एका सलूनमध्ये फिरोज दाढी करीत होता. बुरखाधारी महिला पोलिसाने दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाला फिरोज सलूनमध्ये असल्याची माहिती दिली.
पोलिस असल्याची बतावणी करून फिरोज खान याने एका इसमाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली होती. याप्रकरणी अंधेरी डीएननगर पोलिस ठाण्याच्या पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, चोरटा हा अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती उघड झाली. चोरटा फिरोज खान याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. तो आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक वस्तीच्या आसपास दबा धरून बसले.
पोलिस पथकाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारी व्हँनमध्ये बसून वस्तीत प्रवेश केला. फिराेजने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच फिरोजच्या नातेवाइकांनी पोलिसांना रोखण्याकरिता पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिस आणि फिरोजच्या नातेवाइकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नातेवाइकांच्या प्रतिकाराला न जुमानता अखेरीस फिरोजच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला मुंबईला आणले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार आहे.
इराणी वस्ती पुन्हा रडारवर
गेल्या अनेक वर्षांपासून इराणी वस्तीत चोरट्यांचे वास्तव्य होते. त्याठिकाणी पोलिसांनी अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन केले आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस गेले की, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात.
कधी दगडफेक केली जाते. कधी सामूहिक हल्ला केला जातो. कधी पोलिसांना चावा घेऊन दुखापत केली जाते. एकदा तर पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला होता.
२००८ मध्ये दोन आरोपींना घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन आरोपींचा मृत्यू झाला होता. फिराेज खानच्या अटकेमुळे इराणी वस्ती पुन्हा पोलिसांच्या रडारवर आली आहे.