पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:33 PM2020-08-05T19:33:58+5:302020-08-05T19:37:33+5:30
३ मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त.
पुणे : मोबाईल हरविल्याने त्याने मित्राकडे नवीन मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सराईत गुन्हेगाराने मित्राला नवीन मोबाईल घेऊन देण्याऐवजी रस्त्यात रिक्षाचालकाला चाकुचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.हडपसरपोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ३ मोबाईल, रोख रक्कम, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
बाबासाहेब वसंत कदम (वय३०, रा. माळवाडी, हडपसर), संतोष शंकर गुंजाळ (वय २४, रा. शेवाळवाडी) आणि विनित रामचंद्र वाकडे (वय २३, रा. साईनाथनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुंजाळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत़ विनित वाकडे हा स्वत: बॉक्सर आहे. सधन कुटुंबातील विनित पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता.या दोघांनी लॉकडाऊनमध्ये भाजीविक्रीचा व्यवसायही केला होता.त्यांचा मित्र बाळासाहेब कदम हा एका झायलो कारवर चालक म्हणून काम करतो. कदम याचा मोबाईल हरवला होता. गुंजाळकडे त्याने मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते तिघे कदम याच्याकडील झायलोमधून जात असताना त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ एक रिक्षाचालक उभा असलेल्या दिसला. त्यांनी रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड काढून घेऊन ते गाडीतून निघून गेले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस कर्मचारी नितिन मुंढे, शशिकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे यांना डी पी रोडला आरोपी थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.