शिक्षणाधिकाऱ्यांपुढे बाजू मांडण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात; बीड एसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:18 PM2018-09-01T16:18:11+5:302018-09-01T16:19:28+5:30

परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

Headmasters trap in the bribe of one and a half lakh to set aside the education officer; Bead ACB Action | शिक्षणाधिकाऱ्यांपुढे बाजू मांडण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात; बीड एसीबीची कारवाई

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे बाजू मांडण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात; बीड एसीबीची कारवाई

Next

परळी (बीड ) : सेवेतून कार्यमुक्त केलेल्या लिपिकाने केलेल्या तक्रारीवर शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाखांची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मागील सलग तीन दिवसात बीड एसीबीने लाचखोरांवर केलेली ही चौथी कारवाई आहे.

२०१२ साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल, असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते.

याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती. बीड एसीबीने तक्रारीची खातरजमा करून पाळत ठेवली असता मोदी याने १ सप्टेंबर रोजी दीड लाख रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित ५० हजार एक महिन्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार शनिवारी बीड एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या पेठ गल्ली देशमुख पार येथील राहत्या घराच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे विद्यमान लिपिकाने दिलेली दीड लाखांची रक्कम स्वीकारताच मुख्याध्यापक मोदी याला एसीबीच्या पथकाने झडप घालून रंगेहाथ पकडले. मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याची सेवानिवृत्ती अवघी सहा महिन्यावर आली होती, असे समजते. ७५ वर्षांच्या उज्ज्वल इतिहास असलेल्या संस्थेचा मुख्याध्यापक लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने परळी शहरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, दादासाहेब केदार, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने यांनी पार पाडली. दरम्यान, मागील सलग तीन दिवसात बीड एसीबीने सलग चार कारवाया करून पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. एसीबीच्या कारवायांच्या धडाक्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Headmasters trap in the bribe of one and a half lakh to set aside the education officer; Bead ACB Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.