गुगलच्या गुगलीमुळे डॉक्टराला सतराशेचा हेडफोन पडला लाखाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 09:26 PM2019-07-02T21:26:00+5:302019-07-02T21:27:46+5:30
सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.
मुंबई - गुगलच्या गुगलीमुळे सायन रुग्णालयातील डॉक्टराला सतराशे रुपयांचा हेडफोन १ लाख रुपयांना पडला आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईत राहण्यास असलेले जोसुवा डिसिल्व्हा (२५) हे एमएमबीएस डॉक्टर असून, सायन हॉस्पिटल येथे न्यायवैद्यक शास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी २० जून रोजी फ्लीपकार्डवरून १७२९ रुपयांचा हेडफोन मागवला होता. हेडफोनसाठी त्यांनी ऑनलाइन पैसे भरले. सायंकाळी डिलिव्हरी बॉय हेडफोन घेऊन आला. हेडफोनचे पैसे मागितले. मात्र पैसे आॅनलाइन भरल्याने त्यांनी त्याबाबतचा संदेशही दाखवला. परंतु, डिलेव्हरी बॉयने बिलावर ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ असे नमूद असल्याने हेडफोनचे पार्सल दिले नाही. याबाबत फ्लीपकार्डच्या ग्राहक सेवेला कॉल करण्यास सागितले. त्यांनी, गुगलवरून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्याने, पैसे रिफंड होईल, असे सांगून बँकेच्या डिटेल्स घेतल्या. थोड्या वेळातच त्यांच्या खात्यातून ४९ हजारांचे दोन व्यवहार झाले. त्यानंतर, ४९ हजार रिफंड झाल्याचा संदेश आला. यातच, एकूण १ लाख रुपये काढल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.