मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच अंसी कबीरच्या आईनं केला आत्महत्येचा प्रयत्न; थोडक्यात बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:47 PM2021-11-04T14:47:26+5:302021-11-04T14:47:53+5:30
अंसीचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच तिचे नातेवाईक अंसीच्या घरी जाण्यास निघाले. अंसीचे नातेवाईक जवळच राहतात.
केरळ कोच्ची येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन युवतींचा मृत्यू झाला. या मृत युवतींमध्ये मिस केरळ २०१९ ची विजेती अंसी कबीर(Ansi Kabeer) आणि उपविजेती डॉ. अंजना शाहजहा हिचा समावेश होता. एका दुर्देवी अपघातात दोघींने प्राण गमावला. अंसी आणि अंजनाच्या अचानक एक्झिटनं चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतक्या कमी वयात दोघी युवतींनी जगाचा निरोप घेतला.
अंसी कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच तिची आई हे दु:खं सहन करु शकली नाही. त्यामुळे आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. अंसीच्या आईने झोपेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच उपचार मिळाल्याने अंसीच्या आईचा जीव बचावला. अंसीच्या आईची तब्येत सध्या स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली असताना नातेवाईकांनी अंसीच्या आईला पाहिलं त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.
अंसीचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच तिचे नातेवाईक अंसीच्या घरी जाण्यास निघाले. अंसीचे नातेवाईक जवळच राहतात. त्यामुळे अंसीच्या आईचं सांत्वन करण्यासाठी ते घरी पोहचले. तेव्हा घरातील दरवाजा आतून बंद होता. अनेकदा बेल वाजवली पण कुणीच उघडलं नाही. तेव्हा खिडकीतून पाहिलं असता अंसीची आई जमिनीवर पडल्याचं दिसून आलं. कसंतरी दरवाजा उघडून नातेवाईक आतमध्ये गेले त्यांनी अंसीच्या आईला रुग्णालयात नेले. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आईला तो धक्का सहन झाला नाही म्हणून तिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असं नातेवाईक म्हणाले.
“आता जायची वेळ आलीय...”
अंसी कबीर ही २०१९ मध्ये मिस केरळा बनली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ती मिस साउथ इंडिया बनली होती. अंसी तिरुवनंतपुरम येथे राहणारी होती. तर दुसरीकडे २०१९ मध्ये मिस केरळ रनरअप राहिलेली डॉ. अंजना शजान ही मॉडेलिंग करत होती. दोघींच्या अचानक झालेल्या मृत्यूनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंसी कबीर हिच्या मृत्यूनंतर आता तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. अंसी कबीरनं(Ansi Kabeer) अलीकडेच तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, आता जायची वेळ आली आहे. अंसीने हे बाहेर फिरण्याच्या हेतूने लिहिलं होतं. परंतु अंसीची ही अखेरची पोस्ट ठरेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नाही.