आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:19 AM2019-02-07T06:19:18+5:302019-02-07T06:19:44+5:30
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
एका फोटो जर्नलिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ५ एप्रिल २०१४ रोजी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली.
आरोपींनी २०१४मध्ये दाखल केलेली याचिका अजूनही प्रलंबित आहे, असे म्हणत न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारने मागितलेली मुदतवाढ देण्यास नकार दिला.
ही याचिका २०१४ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे तुम्हाला (केंद्र आणि राज्य सरकार) तयारी करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. या याचिकेच्या निकालावर फाशीच्या शिक्षेला आव्हान देणाºया याचिकांवरील सुनावणी अवलंबून असल्याने त्या याचिकांवरील सुनावणीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी विलंब न करता या तीन याचिकांवर २० फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने सीआरपीसीमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा केली. बलात्कारासारखा गुन्हा दोनदा करणाºयांना सीआरपीसी ३७६(ई)अंतर्गत फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. याअंतर्गत शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, खटल्याच्या सुरु वातीला हे कलम न लावता खटल्याचे काम मध्यावर आले असताना हे कलम लावण्यात आले. त्यामुळे आरोपींनी या कलमाच्या वैधतेलाच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.