एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणीटंचाईने बळी; कल्याणजवळ दगड खाणीतील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 06:12 AM2022-05-08T06:12:09+5:302022-05-08T06:12:28+5:30
कुटुंबातील लहान मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता गेलेल्या अन्य चार जणांचाही बुडून मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावानजीक असलेल्या एका दगड खाणीत पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी महिला खाणीत गेल्या होत्या.
कुटुंबातील लहान मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता गेलेल्या अन्य चार जणांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड (५५) त्यांची सून अपेक्षा गायकवाड (३०), नातू मोक्ष (१३), नीलेश (१५) आणि मयुरेश (१५) हे पाचजण दगड खाणीतील पाणवठ्यावर सायंकाळी कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी खाणीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह रात्री आठ वाजेपर्यंत शोधून काढण्यात आले. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले.
माेक्षपाठाेपाठ भाऊ, आई, आजी बुडाले
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गायकवाड कुटुंबातील मोक्ष हा खाणीतील पाण्यात बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्याकरिता त्याचे भाऊ, आई व आजी यांनी धाव घेतली. परंतु त्यांचाही बुडून मृत्यू झाला.