हृदयद्रावक! पाच वर्षांचा चिमुकल्याचा ट्रॅक्टरवरून कोसळून मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:06 PM2022-07-04T19:06:14+5:302022-07-04T19:07:42+5:30
Five Year Boy Dies : ही दुर्दैवी घटना राघवचे पिता दिनकर शिंदे यांच्यासमोर रविवारी (दि.३) घडली, ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते.
नाशिक : आपल्या पित्यासोबत ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना अचानकपणे पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या तोल गेला आणि चिमुकला रस्त्यावर कोसळला. यावेळी चिमुकला त्याच ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ध्रुवनगरमध्ये घडली. राघव दिनकर शिंदे (रा.शिंदेचाळ, ध्रुवनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना राघवचे पिता दिनकर शिंदे यांच्यासमोर रविवारी (दि.३) घडली, ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते.
शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर येथील बारा बंगला भागात शिंदे चाळ आहे. या चाळीत राहणाऱ्या शिंदे यांनी ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडून रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते आपला मुलगा राघव यास ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित बसून निघाले. वडिलांच्याजवळच शेजारी राघव बसलेला होता. ट्रॅक्टर काही अंतर पुढे गेला असता त्यावेळी राघवचा तोल गेला आणि तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून राघव गंभीररीत्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला. या दुर्घटनेने संपूर्ण ध्रुवनगरसह शिंदे चाळीचा परिसर हादरून गेला. सर्वत्र हळहळ व शोककळा व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी राघवचे काका भैरवनाथ विश्वनाथ शिंदे (४०) यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भैरवनाथ यांच्या फिर्यादीनुसार राघवचे वडील संशयित दिनकर विश्वनाश शिंदे (३८) हे त्यावेळी ट्रॅक्टर चालवित होते. याचवेळी दुर्दैवाने ही दुर्घटना घडली. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यान्वये गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शेंडकर पुढील तपास करीत आहेत.