हृदयद्रावक! बुडत्या मित्राला वाचवायला गेला; साठवण तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:41 PM2020-07-30T23:41:32+5:302020-07-30T23:42:44+5:30
सायंकाळी काम आटोपल्यानंतर दोघही साठवण तलावात हातपाय धुवायला गेले. योगेश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला.
जळगाव : शेतात फवारणी केल्यानंतर हातपाय साठवण तलावात हातपाय धुवायला गेलेल्या योगेश ज्ञानेश्वर वराडे (२०) व ज्ञानेश्वर दगडू ढमाले (२७) दोन्ही रा.विटनेर या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता विटनेर, ता.जळगाव शिवारात घडली. योगेश व ज्ञानेश्वर हे दोघं जिवलग मित्र होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दगडू ढमाले याच्या शेतात गुरुवारी फवारणीचे काम सुरु होते. योगेश हा देखील ज्ञानेश्वरसोबत गेला होता. सायंकाळी काम आटोपल्यानंतर दोघही साठवण तलावात हातपाय धुवायला गेले. योगेश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळ व खोल खड्डा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर हा देखील बुडाला. दरम्यान, मुलगा पाण्यात बुडत असल्याचे लांब असलेल्या दगडू ढमाले यांना दिसले, त्यांनी आरडाओरड करुन घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी तलावात उडी घेतली, मात्र तोपर्यंत दोघंही मृत झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांना माहिती कळविली. हवालदार शिवदास चौधरील बळीराम सपकाळे, सचिन देशमुख, स्वप्नील पाटील व समाधान पाटील यांनी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केले.
दोघंही जिवलग मित्र
योगेश व ज्ञानेश्वर हे दोघही जिवलग मित्र होते. कोठेही ते सोबतच असायचे. या जिवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.योगेश हा अविवाहित होता. वडीलांचे निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ तर ज्ञानेश्वर याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडील असा परिवार आहे.