कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 00:12 IST2021-11-03T00:11:09+5:302021-11-03T00:12:18+5:30
दारूच्या नशेत झालेल्या आकस्मिक वादातून एका कुख्यात गुन्हेगाराला घेरून पाच गुंडांनी त्याची भीषण हत्या केली.

कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दारूच्या नशेत झालेल्या आकस्मिक वादातून एका कुख्यात गुन्हेगाराला घेरून पाच गुंडांनी त्याची भीषण हत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली.
फ्रँक भूषण अन्थोनी उर्फ फ्रँक अण्णा (वय ४०) असे मृताचे नाव असून तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगरात राहत होता. हत्या, हत्येचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला अण्णा अलीकडे रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करत होता. पत्नी आणि दोन मुलांना घेऊन तो मंगळवारी रात्री ७.३० च्या सुमारास मार्टीननगरातील सासुरवाडीत आला होता. तेथून तो खोब्रागडे चौकाजवळ पोहचला. येथे एका ठिकाणी त्याला काही जण वाद घालताना दिसले. त्यामुळे तो त्यांच्याकडे बघू लागला. आरोपींचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने त्यांनी ‘क्या देख रहा बे’ असे म्हटले. यावरून अण्णातील गुन्हेगार जागा झाला. ‘मुझे पहचानता नही क्या’, असे विचारत अण्णाने आरोपींना शिवीगाळ केली. त्यामुळे वाद वाढला अन् दारूच्या नशेत टून्न असलेल्या गुंडांनी अण्णाला घेरून त्याची दगडाने ठेचून भीषण हत्या केली.
अत्यंत वर्दळीच्या चौकाजवळ ही घटना घडल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती कळताच ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय देवकते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी मृतदेह रुग्णालयात हलवून आरोपीची शोधाशोध सुरू केली.
पाच संशयीत ताब्यात
मृतक अण्णाविरुद्ध गिट्टीखदान, अजनी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी मानकापुरात मिथून नामक तरुणाची हत्या झाली होती. त्यात अण्णा सहभागी होता, असाही आरोप आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी धावपळ करत संशयीत आरोपी विक्की उर्फ सतीश नंदलाल तायवाडे, क्रिष्टोफर संजय डेनियल, सोबियल संजय डेनियल, सॅमिन पिटर आणि आकाश रवी वाघाडे या पाच जणांना ताब्यात घेतले. वृत्तलिहस्तोवर त्यांची पोलीस ठाण्यात चाैकशी सुरू होती.