नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता मिळणार अर्थसहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:55 PM2019-12-22T18:55:21+5:302019-12-22T19:03:26+5:30
तातडीने ५० हजाराचे अनुदान; दोन लाखांवर पोलीस कुटुंबियांना दिलासा
जमीर काझी
मुंबई - ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सूव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांवर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजाराची मदत दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे.
पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार या दर्जापर्यतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या निधी,मदती व्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना दिले आहेत.
‘ऑनड्युटी’ विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विमाच्या रक्कम तसेच पोलीस कल्याणनिधीतून विविध स्वरुपात मृताच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास त्यांच्या वारंसाना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रक्कमेच्या स्वरुपात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केल्या कित्येक वर्षापासून अंमलदार वर्गातून केली जात होती. मात्र त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नव्हता.
गेल्या महिन्यात ७ नोव्हेंबरला महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या विशेष सहाय्यता निधीच्या बैठकीमध्ये हा विषय उपस्थित झाला. त्यावेळी जायसवाल यांनी अशा प्रकारे मृत्यूमुखी पडणाऱ्या पोलिसांचे कुटुंबिय आर्थिक विवंचनेत सापडलेले असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याने त्यांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन या निधीतून संबंधित वारसांना सहाय्य मिळेल, त्याशिवाय शासनाकडून,विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्रह ,अनुदानही निर्धारित मुदतीमध्ये दिली जावी, अशा सूचना महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना दिल्या आहेत.
हा निधी मृत्यूमुखी अंमलदाराच्या कायदेशीर वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅँक खातेबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे. त्यानंतर हा निधी संबंधित वारसदारांना दिला जाणार आहे. त्याशिवाय नक्षलग्रस्त भागात, किंवा ड्युटीवर असलेल्या ठिकाणी शत्रुंशी, समाजकंटकांबरोबर प्रतिकार करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना त्या त्या घटनेनुसार निश्चित केलेली रक्कम दिली जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. मात्र नैसर्गिकपणे निधन पावणाऱ्यांच्या वारसांना निर्धारित स्वरुपाशिवाय अशा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना थोडाफार हातभार मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. - सुबोधकुमार जायसवाल (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य)
नक्षलग्रस्त भागात किंवा अतिरेक्यांसाठी लढताना धारार्तीथ पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना लाखोंचा निधी, त्याचप्रमाणे संबंधित अंमलदाराच्या निवृत्तीपर्यत दरमहा वेतन, पदवाढ व भत्ते दिले वारंसांना दिले जातात. मात्र, नैसर्गिक निधन पावलेल्यांना अशी कोणतीही भरीव मदत दिली जात नव्हती, त्यामुळे या निधीमुळे आता वारंसाना थोडा हातभार लाभणार आहे.