'हॅलो, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय'; असं बोलून रुग्णांच्या नातेवाईकांना फसविणारा आरोपी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 10:46 PM2021-02-02T22:46:42+5:302021-02-02T22:47:07+5:30
आतापर्यंत अशा प्रकारे अनेक लोकांना गंडा घातला असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत
पुणे : हॅलो, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय अशी बतावणी करुन ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर औषध आणण्याच्या बहाण्याने पैसे ऑनलाईन पाठविण्यास सांगून गंडा घालणार्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.अमित जगन्नाथ कांबळे (वय ३४, रा. नवी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे अनेक लोकांना गंडा घातला असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत. गेल्या १० वर्षापासून तो लोकांची अशाप्रकारे फसवणूक करत आला आहे. नुकताच बंडगार्डन पोलीस ठाण्यात ब्रिजेश तिवारी यांनी फिर्याद दिली होती. तिवारी यांच्या मुलावर ससून रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरु होते.
कांबळे याने त्यांना संपर्क साधून आपण डॉ. देशपांडे बोलत असल्याचे सांगून तुमच्या मुलाला तत्काळ ३ इंजेक्शन द्यायची आहेत. ती ससून रुग्णालयात शिल्लक नाहीत बाहेर तुम्हाला महाग मिळतील तुम्ही २२ हजार रुपये मला ट्रान्सफर करा, मी माहितीच्या मेडिकलमधून कमी किंमती आणतो, असे सांगितले. त्यांना शंका आल्याने चौकशी केल्यावर त्यांना आपल्याला फसविले जात असल्याचे लक्षात आले होते. त्यावेळी विजय गुदले यांना २० हजार रुपयांना गंडा घातला होता.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा गुन्हा कांबळे याने केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, पोलिस उपरनिरीक्षक रामकृष्ण दळवी, कर्मचारी शेख, हरीष मोरे, संतोष पागार, रुपेश पिसाळ, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे यांच्या पथकाने सापळा रचून कांबळेला ससून रुग्णालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत असे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली.
असा जाळ्यात लोकांना अडकवत
अमित कांबळे हा पाचवीपर्यंत शिकलेला आहे. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना गंडा घातला आहे. त्याला ससून रुग्णालयाची त्याने अगोदर माहिती घेतली होती. रुग्णांची माहिती घेतल्यावर तो बाहेरुन रुग्णालयात फोन करुन डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णाची माहिती विचारत तसेच त्यांच्या नातेवाईकांचा नंबर घेत. त्यानंतर नातेवाईकांना फोन करुन त्यांना ईमजन्सी असल्याचे सांगून ऑनलाईन पैसे पाठवायला सांगत. काही जण त्याप्रमाणे पैसे पाठवत असत.
तब्बल २१ गुन्हे दाखल
अमित कांबळे हा अशाप्रकार २०१०पासून फसवणूक करत आला आहे. त्यांच्यावर समर्थ, सायबर व इतर पोलीस ठाण्यात २०१७ पर्यंत २१ गुन्हे दाखल होते. त्यानंतर काही वर्षे त्याच्या कारनाम्याची माहिती समोर आली नव्हती. आता पुन्हा त्याचे कारनामे सुरु झाले होते. बंडगार्डन पोलीस ठाण्याला एक गुन्हा दाखल असून आम्ही त्याला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले.