हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे; अश्विनी बिद्रेंच्या पतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:20 AM2021-01-09T06:20:20+5:302021-01-09T06:21:07+5:30
Ashwini Bidre murder: हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना, त्यांनी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी पनवेल न्यायालयात सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सुनावली थांबली होती. पनवेलच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू होताच, बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना, त्यांनी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी केला आहे. हेमंत नगराळे यांना या प्रकरणात आरोपी करण्याची जुनी मागणी पुन्हा गोरे यांनी केली आहे.
गुरुवारी नगराळे यांनी डीजीपीची सूत्रे हाती घेतली आहेत. ही केस वर्षभरात संपविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप आहे.
सुनावणी १५ जानेवारीला
पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची नोंद ठेवण्यासाठी डायरी तयार करण्यात येते. त्यात कुरुंदकर हत्येच्या दिवशी नाइट राउंडला असल्याचा उल्लेख आहे, असं न्यायालयात सांगण्यात आले आहे. कुरुंदकरसह आणखी दोन आरोपी या सुनावणीवेळी हजर होते. पुढील सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे.