मूळव्याधीची औषधाची बाटली ८९ हजारांना, टेलरला घातला गंडा, पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:31 PM2023-03-21T12:31:55+5:302023-03-21T12:32:08+5:30
हा प्रकार खार परिसरात घडला असून त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केल्यावर अनोळखी कॉलरवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : मूळव्याधीने ग्रस्त असलेल्या एका टेलरला त्याचे औषध मागविणे हे जवळपास ८९ हजारांना पडले. हा प्रकार खार परिसरात घडला असून त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केल्यावर अनोळखी कॉलरवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हमीद (नावात बदल) हे खारदांडा परिसरात राहत असून त्यांना मूळव्याधीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांनी कोलकत्ता येथील त्यांच्या गावातून आयुर्वेदिक औषध डीटीडीसी कुरिअरद्वारे मागविले होते. त्याचे पैसे याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीने फोन पे मार्फत केले.
दरम्यान, हमीद यांना अभिषेक कुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने तो डीटीडीसीमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमचे पार्सल आले असून पत्ता चुकीचा असल्याने तुम्हाला एक लिंक पाठवितो. ती ओपन करून त्यावर तुमची माहिती द्यावी असेही त्याने सांगितले. हमीद यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि त्यांनी लिंकवर माहिती भरत कॉलरच्या सांगण्यानुसार पाच रुपये त्यावर पाठविले.
तेव्हा तुमचे पार्सल सक्रिय झाले असल्याचे त्याने सांगितले आणि त्याच दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते त्यांना मिळाले. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या खात्यातून पाच व्यवहार होत ८९ हजार ४६५ रुपये काढण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी खार पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.