जडीबुटी देण्याच्या बहाण्याने मुंबईतील ५ जणांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 05:29 AM2020-01-23T05:29:06+5:302020-01-23T05:29:23+5:30
डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच जणांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन बेदम मारहाण केली.
मुक्ताईनगर, (जि.जळगाव) : डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच जणांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोन्याचे दागिने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
डायबेटीससाठी काळी हळद आणि जडीबुटी देतो, असा विश्वास संपादन करून पवार नामक इसमाने अतुल मिश्रा (वय ३५), जटाशंकर गौड (५३, दोघेही रा. गोरेगाव मुंबई,) नागेंद्रप्रसाद ठिवर (५२, रा. नालासोपारा), भरत परमार (५०, रा. कांदिवली), आणि दीपक परमार (५०, रा.मालाड,) यांना मुक्ताईनगरला बोलविले. येथील रक्षा पेट्रोल पंपाजवळ हा संशयास्पद इसम त्यांना भेटला. त्याने पाचही जणांना चारठाणा मधपुरी परिसरात नेले. तेथे एका झोपडीवजा खोलीत बसविले. थंडपेयदेखील पाजले. औषध दाखवत असताना त्यांच्याच टोळीतील १० ते १५ जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही जणांच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घायला आले, असा बनाव करुन मुंबईकरांना लाथाबुक्क्यांसह बांबूने बेदम मारहाण केली. सोने, रोकड, मोबाइल हिसकावून पोबारा केला.
दुर्मीळ वस्तूंचा बहाणा; नव्या टोळ्या सक्रिय
विविध दुर्मीळ औषधी, जडीबुटी तसेच वस्तू देण्याच्या नावाने बाहेरील लोकांना बोलवत लुटमार करणाऱ्या टोळ्या चारठाणा, मधुपरी भागात सक्रिय झाल्या आहेत. संपर्कात आलेल्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना या भागात बोलावता आणि लुटतात.