२६२ कोटींचे हेरॉईन ; दोघा तस्करांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:46 AM2022-08-01T08:46:31+5:302022-08-01T08:46:47+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेएनपीटी परिसरातून कंटेनरमध्ये लपवलेले २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केल्यानंतर याप्रकरणी नुकतीच दोघांना अटक केली आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पंजाबमध्येही झाडाझडती घेतली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून समोर आलेल्या माहितीवरून त्यांचे देशभरात रॅकेट चालत असल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेएनपीटी परिसरातून कंटेनरमध्ये लपवलेले २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले होते. पंजाब पोलिसांच्या माहितीवरून ही कारवाई केली होती. मात्र, कारवाईच्यावेळी केवळ कंटेनर हाती लागला होता. त्यामुळे हे ड्रग्स कोणी मागवले व कुठे पोहोचवले जाणार होते, याचा उलगडा झाला नव्हता. तर या प्रकरणात कंटेनरमधून मार्बल मागविणारे व सहा महिने कंटेनर पडून असतानाही ताबा न घेणारे संशयाच्या घेऱ्यात आले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशीत दोघांना अटक केली. दिल्ली व गुजरात येथून त्यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
गुन्ह्याच्या तपासाबाबत गोपनीयता
गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून ‘विशेष’ गोपनीयता राखली जात आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्याशी संपर्क साधला असता, अधिक तपास सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखा पोलिसांची वेगवेगळी पथके पंजाब व इतर राज्यांत तळ ठोकून असल्याचेही सूत्रांकडून समजते. परंतु, अद्यापपर्यंत सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती फरार झाली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.