सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीचा प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: August 6, 2023 12:06 AM2023-08-06T00:06:45+5:302023-08-06T00:07:54+5:30
परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सांगली : वन विभागाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार संपूर्ण राज्यात गाजत असताना सांगलीतही वन विभागाच्या परीक्षेत चलाखीने कॉपी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव, ता. वैजापूर) आणि अर्जुन रतन नार्डे (रा. संजरपूर वाडी, ता. वैजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. वन अधिकारी युवराज पाटील यांनी दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील अविनाश गुमलाडू याला अटक करण्यात आली आहे. मिरज रोडवर असलेल्या वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्चमध्ये वनरक्षक पदासाठीच्या भरतीचा पेपर गुरुवारी होता.
दुपारच्या सुमारास पेपर सुरू झाल्यानंतर संशयित अविनाश गुमलाडू याने त्याच्या बुटामध्ये मोबाइल लपवून ठेवला होता, तर केसांतून मोबाइल ब्ल्यूटुथ हेडफोन लावून तो पेपर लिहीत होता. गंभीर बाब म्हणजे मोबाइलवरून औरंगाबाद जिल्ह्यातीलच असलेला दुसरा संशयित अर्जुन नार्डे हा त्याला उत्तरे देत होता. परीक्षेदरम्यान तपासणीसाठी आलेल्या वन विभागाच्या पथकास ही बाब निदर्शनास आली.
यावेळी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे मायक्रोफोन, मोबाइल, सँडल जोड, डिव्हाइस, अशा ३ हजार ४५० रुपयांच्या वस्तू मिळून आल्या. या माध्यमातूनच तो कॉपी करत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने संशयिताला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीही गैरप्रकारांचा संशय
पोलिसांच्या चौकशीत संशयित गुमलाडू याने सांगितले की, मोबाइल आणि डिव्हाइस हे दुसरा संशयित नार्डे याने दिले असून, पेपर सुरू झाल्यानंतर तो याद्वारे उत्तरे देत होता. नार्डे याने यापूर्वीही अनेक शासकीय परीक्षांत या प्रकारे गैरप्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार आता तपास सुरू करण्यात आला आहे.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
वन विभागाच्या तपासणी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला असला तरी, तंत्रज्ञानाची मदत घेत परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यातच छत्रपती संभाजीनगर येथे एका अकॅडमीचा संचालकच प्रश्नांची उत्तरे देताना पोलिसांना सापडला होता.