हिम्मतवाली खचली... अन् जीवन संपविले; अठराविश्वे दारिद्र्य असुनही आतापर्यंत संकटांशी लढलेली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:31 AM2022-12-18T08:31:56+5:302022-12-18T08:32:05+5:30
गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करता येणार नाही म्हणून तिने घेतला टाेकाचा निर्णय
- नितीन नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा (नागपूर) : ‘ती’ अत्यंत हुशार आणि हिम्मतवाली... अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण हाेणाऱ्या ‘तिने’ उच्च शिक्षणाचे ध्येय मनाशी बाळगले. मात्र, घरात अठराविश्वे दारिद्र्ये... ही जाणीव ठेवत तिने शिक्षण घेण्याच्या मार्गातील आतापर्यंतचे अडथळे दूर केले. मात्र, उच्च शिक्षणातील अडथळे दूर हाेणार नाहीत, ही खंत मनात खाेलवर रुतल्याने ‘तिने’ टाेकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविली. संजना ऊर्फ मेघना संजय सातपुते (२०, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
संजनाला दहावी-बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळाले. त्यानंतर तिने बीएस्सीला प्रवेश घेतला. पण कोरोनाकाळात मजुरी करून मोबाइल खरेदी केला व ऑनलाइन परीक्षा दिली; पण प्रथमवर्षाचा पेपर सबमिट न झाल्याने प्रवेश हुकला. पुढे कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला; परंतु बस पाससाठी पैसे नसल्याने हे ध्येय पूर्ण करता आले नाही.
हिमतीची दाद अन् चर्चा
संजना ही ‘हिम्मतवाली’ हाेती, तेवढीच ती खंबीरही हाेती. एकदा बसने जात असताना एका विद्यार्थिनीची एक मुलगा छेड काढत हाेता. ही बाब संजनाला दिसताच तिने त्याला पकडले अन् चांगलेच बदडले. नृत्य स्पर्धा, रनिंग असाे की काेणत्याही प्रकारची स्थानिक पातळीवरील स्पर्धा असाे, त्यात ती सहभागी व्हायची आणि बक्षीस हमखास मिळवायची.
घरात घेतला गळफास
स्पर्धा परीक्षेची तिने तयारी सुरू केली. मात्र, अशात ती निराशेच्या गर्तेत गेली अन् दाेन दिवसांपूर्वीच तिने जगाला निराेप देण्याची तयारी केली. तिने तिचे सर्व कागदपत्रे पेटवून दिली. गुरुवारी तिने गळफास घेतला.