आठ लाख लंपास करणाऱ्या चोरट्यास हिंगणघाट पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 04:52 PM2021-03-21T16:52:43+5:302021-03-21T16:53:21+5:30
Robber nabbed by HInganghat police : या चोरीत वापरलेले दुचाकी वाहन मोबाईल, 3 हजार 280 रोख असा 44हजार 280 रुपयांचा माल पोलीसांनी त्याचे कडून जप्त केले आहे.
हिंगणघाट (वर्धा) - येथील संत चोखोबा वार्ड येथे झालेली आठ लाखाची घरफोडी हिंगणघाट पोलिसांनी दोन दिवसात उघड केली असून, यातील दुसरा आरोपी रोशन अनिल डोंगरे वय 25 यास मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोधिखेडा गावातून अटक केली आहे. या चोरीत वापरलेले दुचाकी वाहन मोबाईल, 3 हजार 280 रोख असा 44हजार 280 रुपयांचा माल पोलीसांनी त्याचे कडून जप्त केले आहे.
शहरातील संत चोखोबा वॉर्ड येथील जितेंद्र अमरनाथ राउत (वय 37) यांच्या घरी कुलूप तोडून आठ लाख रुपये रोख व सोने स्वरूपातील चोरी रविवार १४ मार्चला झाली होती. ते गावोगावी फिरून बाजारा बाजारांमध्ये हॉटेलचा फिरता व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांच्याकडे साडे पाच लाख रुपये रोख जमा झाले होते. हे जमा झालेले पैसे ते आपल्या घरातील कपाटात डब्यांमध्ये भरून ठेवत असे. तसेच घरातील सर्व सोने जवळपास आठ तोळे हे देखील कपाटातील डब्ब्यात ठेवलेले होते. राऊत यांची दोन्ही मुले हे मोठी वणी येथे त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी म्हणून ठेवलेली आहेत. या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी जितेंद्र राऊत आपल्या पत्नीसोबत शनिवारी 13 मार्च रोजी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी आल्यावर त्यांना त्यांच्या घराचे दार खुले दिसले घरात जाऊन बघितलं तर कपाटातील सर्व सोने व नगदी पैसे असे एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे त्यांना निदर्शनात आले. लगेच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच फिंगरप्रिंट देखील घेण्यात आले. या प्रकरणात घरफोडी झालेल्या घराच्या परीसरातच राहणार्या सोन्यालसिंग उर्फ सोनु भादा(२८) याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असता त्याने दोन साथीदारांना सोबत घेउन रविवार दि.१४ च्याच रात्री ही घरफोडी घडविली असल्याचे पोलिसांना सांगीतले. त्याच्या कडून चोरी केलेली एक सोन्याची पोत, तीन कर्ण फुले व नगद 25 हजार रुपये पोलिसांनी अगोदरच हस्तगत केले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक डॉ प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण करीत असून त्यांना स. फौजदार सादिक शेख, विवेक बन्सोड, गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे, शि. प्रशांत वाढई सहकार्य करीत आहे