Hinganghat Verdict: हिंगणघाट जळीतकांडातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेप; कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:59 PM2022-02-10T16:59:37+5:302022-02-10T17:18:23+5:30
Hinganghat burning case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वर्धा - जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला दोषी करार दिल्यानंतर आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आज ऍड. उज्जवल निकम यांनी अनेक दाखले दिले. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते.
या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी बुधावारी स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज न्यायालयाने दोषी विकेश उर्फ विक्की नरगाळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त
संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी तब्बल १३ अधिकारी, ९८ कर्मचारी तसेच दंगल नियंत्रक पथकाने खडा पहारा दिल्याने हिंगणघाटच्या न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
काय आहे घटना?
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले.
फाशी झाल्यावरच पूर्ण समाधान -
न्यायालयाने आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुन्हा सिद्ध होणे हे आमच्या कुटुंबीयांसाठी तात्पुरते समाधान आहे. ज्यावेळी त्याला फाशीची शिक्षा होईल, तेव्हाच आमचे पूर्ण समाधान होईल, असे अंकिताच्या वडिलांनी म्हटले होते. आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली तरच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून वचक निर्माण होईल, असेही ते म्हणाले होते.