हिंगोलीत खून प्रकरणात चौघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 07:29 PM2018-07-30T19:29:06+5:302018-07-30T19:29:24+5:30
शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती.
हिंगोली : शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती. या प्रकरणात चौघांना अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी ३० जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी तालुक्यातील पोळोदी येथील शेत गट क्रमांक १३६ मध्ये १ जून १०१५ रोजी शिवानंद वायकुळे व त्यांच्या पत्नी तसेच औतवाले हे शेतात जात असताना ११ जणांनी संगनमत करून अडविले. याबाबत शिवानंद यांनी त्यांचे भाऊ (फिर्यादी) गणेश बापूराव वायकुळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर गणेश वायकुळे, साक्षीदार मालतीबाई वायकुळे, सखुबाई वायकुळे यांनी औत का अडविले याबाबत विचारणा केली. यावेळी आरोपींतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून व पूर्वीच्या शेताच्या वादातून धारदार शस्त्राने तसेच काठ्या व कु-हाडीने, दगडाने शिवानंद वायकुळे यांच्या डोक्यात मारहाण केली. यात शिवानंद यांचा मृत्यू झाला. तसेच गणेश वायकुळे व त्यांच्या आईस जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी गणेश वायकुळे यांनी याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी सुभाष शंकरअप्पा सातभाई, गजानन शंकरअप्पा सातभाई, शिवानंद सातभाई, रवि सुभाष सातभाई, रमेश सुभाष सातभाई, शंकरअप्पा सुभानजी सातभाई, मणकर्णाबाई सुभाष सातभाई, हरि संतोष हिंगणकर, पोलीस कर्मचारी सुरेश नारायण संगेकर, प्रतिमा गजानन सातभाई, ज्योती शिवानंद सातभाई यांच्याविरूद्ध कलम ३०२, ३०७, १२०, (ब), १४३, १४७, १४८, १४९ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासिक अंमलदार पोनि सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोप दाखल केले.
सदर प्रकरण अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्या समोर चालला. सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासले. यापैकी फिर्यादी व साक्षीदार गणेश वायकुळे तसेच मयताची आई सखुबाई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी सुभाष शंकरअप्पा सातभाई, गजानन शंकरअप्पा सातभाई, शिवानंद शंकरअप्पा सातभाई सर्व रा. मोरवाडी तसेच पोलीस कर्मचारी सुरेश नारायण संगेकर आदींना कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा, तसेच प्रत्येकी २५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आरोपी प्रा. रवि सुभाष सातभाई यास एक वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा. शंकरअप्पा सुभानजी सातभाई, प्रतिमा गजानन सातभाई यांच्याकडून १ वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेतले व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड ठोठावला. उर्वरित चौघांना निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकरी वकील गजानन व्ही. घुगे यांनी काम पाहिले.