हिंजवडी : बलात्कारप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:41 AM2018-09-26T02:41:53+5:302018-09-26T02:42:01+5:30
कासारसाई येथे घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी दोन संशयित आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंजवडी - कासारसाई येथे घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी दोन संशयित आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण अधिक संवेदनशील झाले आहे. दुसऱ्या पीडित मुलीकडे पोलिसांनी केलेल्या
तपासात आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, २९ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथील ऊसतोडणी कामगारांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी एका आरोपीसह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चौकशी केली असता, पीडित मुलीने आणखी दोन आरोपींची नावे सांगितली. त्यामुळे त्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुमीरन गुरुदास गायकवाड (वय १८), सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ) अशी सोमवारी रात्री उशिरा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी गणेश निकम याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलीने आणखी दोन आरोपींची नावे सांगितल्याने
पोलिसांना याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आरोपींवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून १२ वर्षांच्या दोन मुलींना झुडपात नेऊन आरोपींनी बलात्कार केला. या घटनेनंतर त्रास होत असलेल्या एका पीडित मुलीचा बुधवारी १९ सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बलात्काराची ही घटना उघडकीस आली होती. सर्वच स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अशातच हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, आणखी दोन आरोपींची नावे पुढे आली आहेत.