महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 02:34 PM2019-03-16T14:34:50+5:302019-03-16T14:35:37+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती.
पुणे : नऱ्हे गावच्या महिला सरपंचांच्या पतीच्या अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिला सरपंचाचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नऱ्हे गावच्या सरपंच मीनाक्षी बाळासाहेब वनशिव (वय ५०) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता आंबेगाव खुर्द येथील बेंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर घडली. बाळासाहेब वनशिव हे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. १३) पहाटे ५.३० वाजता बाळासाहेब वनशिव हे त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर यांच्यासह पायी फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. बेंगलुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने ते घरी येत असताना एक संशयिताने त्याच्या कारने पाठीमागून येत त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. बाळासाहेव वनशिव व संशयितामध्ये शेत जमिनीवरून वाद होते. तसेच फिर्यादी व संशयिताची पत्नी ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभ्या होत्या. या निवडणुकीत फिर्यादी निवडून आल्या. पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे पाटील यांनी सांगितले.