खळबळजनक! सपाचा नेत्यासह त्याच्या पत्नीची हत्या, मृतदेह पुरले होते घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 04:12 PM2022-03-12T16:12:40+5:302022-03-12T16:13:52+5:30
Double Murder Case : शिवलोक कॉलनीत राहणारे राजेश अग्रवाल हे समाजवादी पार्टीचे बिझनेस सेलचे प्रदेश सचिव होते. त्यांची पत्नी बबली हिचे शक्ती चौकात ब्युटी पार्लर आहे. अनेक मुली पार्लरमध्ये कामही करतात.
बिजनौर - बिजनौरमध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून बेपत्ता असलेले सपाचे बिझनेस सेलचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह घरात पुरण्यात आले. ज्या घरात मृतदेह सापडले ते घर सपा नेत्याच्या पत्नीच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने तिच्या मुलासोबत एकत्र येऊन ही हत्या केली आहे. शिवलोक कॉलनीत राहणारे राजेश अग्रवाल हे समाजवादी पार्टीचे बिझनेस सेलचे प्रदेश सचिव होते. त्यांची पत्नी बबली हिचे शक्ती चौकात ब्युटी पार्लर आहे. अनेक मुली पार्लरमध्ये कामही करतात.
अचानक बेपत्ता झाले होते
28 फेब्रुवारी रोजी राजेश आणि त्याची पत्नी बबली अचानक बेपत्ता झाले. या जोडप्याला मूलबाळ नसल्याने अनेक दिवसांपासून कोणीही त्यांच्याविषयी माहिती घेतली नाही. तब्बल आठवडाभरानंतर सतत मोबाईल बंद राहिल्याने राजेशच्या नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी, बबलीच्या भावाने काही सपाच्या नेत्यांसह एसपींची भेट घेतली आणि काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली. यानंतर शहर पोलीस तपासात गुंतले.
काटेकोरपणे चौकशीअंती संशयाची सुई महिलेकडे
पोलिसांनी शुक्रवारी रात्री ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या हमीरपूर गावातील रहिवासी रुमाला गाठले. संशयावरून तिच्या मुलालाही ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनी कबूल केले की, त्यांनी इतर दोघांसह या जोडप्याची हत्या केली आणि हमीरपूर येथील त्यांच्या घरात खड्डा खणून मृतदेह पुरले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. आई आणि मुलाशिवाय अन्य दोन मारेकऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
रुमाला संपत्तीचा ताबा घ्यायचा होता
ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या रुमाच्या पतीचे फार पूर्वीच निधन झाले होते. रुमाच्या घराचा खर्च पार्लरमधूनच चालत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. रुमालाही या जोडप्याच्या घरी जावे लागले. रुमाची नजर जोडप्याच्या मालमत्तेवर होती. या जोडप्याचा खून झाला तर कोणाला कळणार नाही आणि त्यांचे घर आणि पार्लर सहज ताब्यात येईल, असे तिला वाटत होते.
राजेश अग्रवाल हे अलिगढचा रहिवासी
राजेश अग्रवाल हे चंद्रशेखर अग्रवाल यांचा मुलगा होता असून मूळचे अलिगढच्या कृष्णा कॉलनीचे होते. २० वर्षांपूर्वी त्यांनी कुटुंबाशी संबंध तोडले. पत्नी आणि मुलगा मुलीला सोडून बिजनौरला स्थायिक झाले होते. गाझियाबादच्या खोडा कॉलनीत राहणार्या बबली उर्फ बबिताशी दुसरे लग्न झाले होते. पत्नी प्रोफेसर आणि मुलगा परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले जात आहे.