ऐतिहासिक निकाल, आईने साक्ष दिली अन् मुलास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:42 AM2021-12-21T10:42:05+5:302021-12-21T10:43:37+5:30
आरा टाऊन पोलीस हद्दीतील शीतल टोला परिसरातील ही घटना आहे. यातील आरोपीचे नाव आदित्यराज ऊर्फ बिट्टू असून आईनेच त्याविरुद्ध पोलीस तक्रार केली होती.
नवी दिल्ली - दारू पिऊन आपल्या आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी एका खटल्यात जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दारू पिऊन गोंधळ घातला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायाधीश त्रिभूवन यादव यांनी आरोपी मुलास 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 1 लाख रुपये आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.
आरा टाऊन पोलीस हद्दीतील शीतल टोला परिसरातील ही घटना आहे. यातील आरोपीचे नाव आदित्यराज ऊर्फ बिट्टू असून आईनेच त्याविरुद्ध पोलीस तक्रार केली होती. शीतल टोला निवासी रामावती देवी यांनी 10 जून 2021 रोजी शहर पोलीस ठाण्यात मुलगा आदित्यविरुद्ध तक्रार दिली होती. त्यामध्ये, मुलगा आदित्यने दारुच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करुन त्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आई-वडिलांची सुटका केली. तसेच, नशेत असलेल्या आदित्य उर्फ बिट्टूला ताब्यात घेतले होते. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला तुरुंगात टाकण्या आले.
पोलीस एफआयआरमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुलाने मारहाण करुन आईकडील पैसही घेण्याचा प्रयत्न केला होता. एक्साईजचे अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपी मुलाच्या आईनेच कोर्टात जबाब दिला होता, तर तीन पुरावेही सादर केल होते. तसेच, पोलीस तपास अधिकारी नीता कुमारी यांनीही न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला होता. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजुने लढण्यास एकही वकील पुढे आला नाही.