५ जोडे मारा अन् १५ हजार दंड घ्या; रेप केसमधील आरोपीला पंचायतीनं सुनावला अजब शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:08 PM2024-07-31T12:08:55+5:302024-07-31T12:10:22+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पंचायतीसमोर उभं केले, त्यानंतर पंचायतीत त्याला मिळालेल्या शिक्षेबाबत सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या आग्रा इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पंचायतीनं शिक्षा सुनावली. आरोपीला जोड्याने मारा, १५ हजार रुपये दंड भरा असा अजब निर्णय मौलानानं सुनावलं. पीडित मुलीच्या घरच्यांनी आरोपी मुलाला जोड्याने मारले या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार मिळताच गुन्हा दाखल केला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यांनी परिसरातील एका युवकावर आरोप केले होते. मात्र त्यानंतर कुटुंबाने तक्रार मागे घेतली. आता पोलीस या व्हायरल व्हिडिओची तपासणी करत आहे. आग्रातील शाहगंज भागातील हा प्रकार आहे. याठिकाणी एक अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर गेली होती. परिसरातील एका युवकाने तिला घेऊन गेल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करत मुलीचा शोध घेतला. त्यानंतर पीडित कुटुंब आणि समाजातील काही लोकांनी आम्हीच मुलीचा शोध घेऊ असं सांगत तक्रार मागे घेतली असं त्यांनी म्हटलं.
पंचायतीत मौलानानं सुनावला निर्णय
मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणी मोहल्ल्यातील एका घरात पंचायतीची बैठक बसली. या पंचायतीत कथित मौलाना उपस्थित होता. आरोपी युवक आणि पीडित कुटुंब यांच्यात सुनावणी झाली. त्यावेळी पीडित मुलीच्या घरच्यांनी आरोपी युवकावर मुलीला बहाण्याने घेऊन गेल्याचा आरोप केला. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत बलात्कार केल्याचंही कुटुंबाने म्हटलं.
पंचायतीत झालेल्या सुनावणीत आरोप प्रत्यारोपानंतर कथित मौलानाने त्याचा निर्णय सुनावला. त्याने आरोपीला ५ जोड्याने मारा आणि त्याच्याकडून १५ हजार आर्थिक दंड घ्या अशी शिक्षा सुनावली. त्यानंतर भर पंचायतीत पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी युवकाला जोडे मारले. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच एसपींनी सांगितले, तक्रार मिळाल्यानंतर आम्ही यावर कायदेशीर कारवाई करू. मात्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.