नागपुरातील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील हलगर्जी भोवली, वाठोड्यातील पोलीस ठाणेदार निलंबित
By योगेश पांडे | Published: June 19, 2024 10:21 PM2024-06-19T22:21:22+5:302024-06-19T22:21:30+5:30
रक्ताचे नमुने दोन दिवस पोलिस ठाण्यातच ठेवले : गंभीर प्रकरणात पोलिसांची अक्षम्य चूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटपाथवर झोपलेल्या गरीबांना चिरडण्याच्या प्रकरणामुळे शहरातील पार्टीकल्चर आणि पोलिसांचे दुर्लक्ष या बाबी परत ऐरणीवर आल्या आहेत. या गंभीर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यावरदेखील पोलिसांनी हलगर्जी दाखविली. आरोपी कार चालक आणि त्याच्या साथीदारांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्याऐवजी दोन दिवस पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. ही बाब समोर आल्यानंतर वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
१६ जून रोजी मध्यरात्री दिघोरी टोलनाक्याजवळ मद्यधुंद विद्यार्थ्यांनी फुटपाथवर झोपलेल्या नऊ गरीब लोकांना चिरडले. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जेवण करून फुटपाथवर झोपले असताना मद्यधुंद विद्यार्थ्यांनी त्यांना धडक दिली व त्यात कांतीबाई गजोड बागडिया (वय ४२) व सीताराम बाबूलाल बागडिया (३०) यांचा मृत्यू झाला. तर सीतारामची पत्नी कविता (२८), मुलगा बुलकू (८), मुलगी हसीना (३), सकिना (१.५), हनुमान खजोड बागडिया (३५), त्याचा मुलगा विक्रम ऊर्फ भुशा (१०), पानबाई मानसिंग बावरिया (१५) हे जखमी झाले होते. हे सर्व लोक राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील गुंडी येथून कामासाठी नागपुरात आठ महिन्यांअगोदर आले होते. पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळावरून फरार झालेला चालक भूषण नरेश लांजेवार (२०, प्लॉट क्रमांक १५, सेनापतीनगर, दिघोरी) याच्यासह वंश राजू झाडे (१९, योगेश्वरनगर, वाठोडा), सन्मय दिगांबर पात्रीकर (२०, अंबानगर, दिघोरी), अथर्व बानाईत (२०, अयोध्यानगर), ऋषिकेश धनंजय चौबे (२०, रामेश्वरी) व अथर्व मोगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.
वाठोडा पोलिसांनी १७ जूनच्या पहाटे वैद्यकीय तपासणीत आरोपी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. डॉक्टरांनी नमुने वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नियमानुसार हे नमुने तातडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. त्याच्या अहवालाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाते. आरोपींना शिक्षा होण्यासाठीही हा अहवाल प्रभावी ठरतो. वाठोडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय दिघे ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा तपास करत होते. आरोपींचे नमुने तातडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणे बंधनकारक होते. यामध्ये दिघे यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यांनी पोलिस ठाण्यातच नमुने ठेवले. १७ आणि १८ जून रोजी पोलिस ठाण्यात नमुने ठेवण्यात आले होते. हे नमुने निर्धारित तापमानात ठेवले जातात. याचे पालन न केल्याने अहवालात लक्षणीय बदल होऊ शकतात. याचा फायदा आरोपींना होऊ शकतो. हा घोर निष्काळजीपणा आज सकाळी उघडकीस आला. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्ररुमाप सिंगल यांनी दिघे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर हे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. सीमा दातारकर यांच्याकडे वाठोडा पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे.
नमुने बदलले का ?
पुण्यात अल्पवयीन मुलगा आरोपी असताना तेथे त्याच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर आणि त्याच्या सहाय्यकांना अटक करण्यात आली होती. नागपुरातील या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात तर आले नाही ना अशीच चर्चा रंगली होती.