वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ‘हिट अँड रन’; कॉन्स्टेबल जखमी, पीएसआय थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:06 AM2023-02-27T06:06:09+5:302023-02-27T06:06:19+5:30
पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंक येथे शनिवारी रात्री ऑडी गाडीने दिलेल्या धडकेत वांद्रे पोलिस ठाण्याशी संलग्न असलेले हवालदार बंकट नवगिरे गंभीर जखमी झाले, तर पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पोकळे थोडक्यात बचावले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल सुरू केला आहे.
पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना आला होता. त्यानुसार, पोकळे आणि नवगिरे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, नवगिरे आणि पोकळे हे घटनास्थळी पंचनामा करत होते. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने एक कार झिगझॅग करत पोकळेंच्या दिशेने आली. तेव्हा त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी टोल प्लाजाच्या दिशेने धाव घेतली, तर नवगिरे हे रस्त्याच्या बाजूने धावले. मात्र, कार उजव्या दिशेने येत असल्याने नवगिरेना तिची जोरदार धडक बसली. ज्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळावरून कारचालक पळाला
अपघातानंतर ऑडी कारच्या चालकाने आपले वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर, पांडुरंग पोकळे यांनी तातडीने बंकट नवगिरेना वांद्रेच्या भाभा रुग्णालयात हलविले. तिथे नवगिरे यांच्या डाव्या हाताचे हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरने सांगितले. उपचारानंतर नवगिरे यांना घरी सोडण्यात आले. ही संपूर्ण घटना सी लिंकवरील टोल प्लाझा कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ऑडीचालकाचा शोध सुरू आहे.